जे.जे. रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा कारागृहात राहून मृत्यू पत्करेन -स्टॅन स्वामी
रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा कारागृहात मरण पत्करेन
स्टॅन स्वामी; अंतरिम जामीन मंजूर करण्याची विनंती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषद व कोरेगाव भीमाप्रकरणी आरोपी असलेले फादर स्टॅन स्वामी यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्याऐवजी आपला अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी विनंती स्वामी यांनी उच्च न्यायालयाला गुरुवारी केली. मला जे.जे. रुग्णालयात दाखल करू नका. त्याऐवजी मी कारागृहात मरण पत्करेन, असे स्वामी यांनी न्या. एस. जे. काथावाला व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाला सांगितले.
शुक्रवारी न्यायालयाने स्टॅन स्वामी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयासमोर हजर ठेवण्याचे आदेश तळोजा कारागृह प्रशासनाला दिले. स्वामी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केल्यानंतर न्या. काथावाला यांनी त्यांच्या तब्येतीची, कारागृहातील स्थितीविषयी चौकशी केली. तब्येतीत सुधारणा होईपर्यंत जे. जे. रुग्णालयात भरती होण्यास तयार आहात का? असे त्यांनी स्वामी यांना विचारले.
‘मी यापूर्वी दोनदा या रुग्णालयात उपचार घेतला आहे. प्रकृती सुधारण्याऐवजी माझी तब्येत खालावली आहे. जर या गोष्टी अशाच सुरू राहिल्या तर लवकरच माझा मृत्यू होईल,’ असे स्वामी यांनी न्यायालयाला सांगितले.
स्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात अर्थ नाही. तिथे पुरेशा सुविधा नाहीत. साधे एमबीबीएस झालेले डॉक्टरही नाहीत, असे स्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने स्वामी यांना अन्य रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची सूचना केली. मात्र, त्यांनी ठाम नकार दिला.
* रांची येथील घरी जाण्याची परवानगी द्या!
न्यायालयाने कारागृह प्रशासनाला स्वामी यांना जे. जे. रुग्णायात नेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश याआधीच्या सुनावणीत दिले होते. त्या आदेशाचे पालन झाले का? अशी विचारणा न्यायालयाने करताच स्वामी यांनी सकारात्मक उत्तर दिले. जे. जे. व्यतिरिक्त अन्य कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत का? अशी विचारणाही केली. मात्र, ‘मला अन्य कोणत्याही रुग्णालयात उपचार घ्यायचे नाहीत’, असे स्वामी म्हणाले. कोणतेही रुग्णालय उपचार करू शकत नाही. त्यामुळे मला माझ्या रांची येथील घरी जाण्याची परवानगी द्या. माझा अंतरिम जामीन मंजूर करा, अशी विनंती केली. न्यायालयाने पुढील सुनावणी ७ जून रोजी ठेवली आहे.
................................