Iqbal Singh Chahal ( Marathi News ) : ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांची आज बदली करण्यात आली असून चहल यांच्यावर गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच अपर मुख्य सचिव (खनिकर्म), उद्योग, ऊर्जा व खनिकर्म विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभारही चहल यांच्याकडे देण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर चहल यांची मुंबई महापालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये त्यांच्यावर मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चहल यांची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
"शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती अपर मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार ख्यमंत्री महोदयांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार सुजाता सौनिक, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा. तसेच आपल्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून असलेल्या अपर मुख्य सचिव (खनिकर्म), उद्योग, ऊर्जा व खनिकर्म विभाग या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यत आपल्याकडे सोपवण्यात येत आहे. तरी, सदर पदाचा अतिरिक्त कार्यभारही आपण धारण करावा," अशी सूचना राज्य शासनाकडून इक्बालसिंह चहल यांना करण्यात आली आहे.