मुंबई : आयएएस अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या एका भामट्या तरुणाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. सुरज दत्तात्रय कणसे (२३) असे त्याचे नाव असून त्याने यूपीएसी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सांगून राजकीय नेत्यांकडून स्वत:चा सत्कार करवून घेतला होता. त्याचे काही होर्डिंग घाटकोपर परिसरात लावण्यात आले होते. त्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे.घाटकोपरच्या नित्यानंदनगर परिसरात कणसे हा कुटुंबीयांसोबत राहायाचा. घराच्या हलाखीच्या परिस्थितीत त्याने १०वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अनेकांनी त्याला यासाठी आर्थिक मदत केली. मात्र कॉलेजला जाताच त्याला महागडे कपडे, मजा मस्तीचे वेड लागले. त्यासाठी त्याने नागरिकांना गंडा घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला यूपीएससीच्या परीक्षेसाठी पैशांची गरज असल्याचे सांगून पैसे उकळले. मुलगा आयएएस होणार, या आशेने अनेकांनी त्याला मदत केली. मात्र व्यसनात अडकलेल्या सुरजची हव्यासापोटी चटक वाढत गेली. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले. मात्र त्याने परिसरात आपण यूपीएसची परीक्षा पास झाल्याची थाप मारीत विविध जणांकडून सत्कार स्वीकारु लागला. तर विभागातील नेत्यांनी त्याच्या घरी जाऊन, तर कधी कार्यालयात बोलावून जाहीर सत्कार करून त्याच्यासोबत फोटो काढून घेतले. त्यानंतर आयएसचे प्रशिक्षण सुरू असल्याचे सांगून तो पैसे ऊकळू लागला. याच परिसरातील व्यायामशाळेच्या मालकाकडून खर्चापोटी १० लाख रुपये उकळून महागडा मोबाइल आणि लॅपटॉप खरेदी केला. मात्र तो फसवणूक करीत असल्याची शंका आल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार केली. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील, निरीक्षक कांतीलाल कोथंबिरे यांनी त्याची चौकशी करून बिंग फोडले. (प्रतिनिधी)
तोतया आयएएस अधिकाऱ्याला अटक
By admin | Published: February 09, 2017 5:04 AM