''गांधींचा अपमान करणाऱ्या 'त्या' अधिकार्याकडे शासनाने काणाडोळा करावा हे अशोभनीय''
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 10:26 PM2019-06-02T22:26:51+5:302019-06-02T22:27:10+5:30
महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त ट्विट केल्यामुळे महिला आयएएस अधिकारी निधी चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
मुंबईः महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त ट्विट केल्यामुळे महिला आयएएस अधिकारी निधी चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. आता शरद पवारांनीही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पवारांनी ट्विट करत या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. पवार म्हणतात, मुंबई मनपावर उपायुक्तपदी कार्यरत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता म. गांधींच्या 150व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील त्यांचे पुतळे हटवावेत, असे धक्कादायक विधान सोशल मीडियावर केल्याचे समजते. या विधानात महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरणही करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासकीय अधिकार्याकडून असा प्रमाद घडावा व शासनाने त्याकडे काणाडोळा करावा हे अशोभनीय आहे. शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकार्यावर कडक कारवाई करावी, असंही पवार म्हणाले आहे. शरद पवारांनी निधी चौधरी प्रकरणात सरकारला धारेवर धरलं आहे.
शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकार्यावर कडक कारवाई करावी.@CMOMaharashtrapic.twitter.com/lIe0QS6y3J
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 2, 2019
निधी चौधरी यांनी 17 मे रोजी एक ट्विट केलं होतं, त्या ट्विटमध्ये महात्मा गांधींचे नोटांवरून फोटो काढून टाका, जगभरातील त्यांचे पुतळे हटवा, असं म्हटलं होतं. या वादग्रस्त ट्विटमुळे निधी चौधरी यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निधी चौधरींना निलंबित करण्याची मागणी केली होती.