महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिपी रस्तोगी Lipi Rastogi असं मुलीचं नाव असून ती २७ वर्षांची होती. मंत्रालयासमोरील सुनीती इमारतीत रस्तोगी कुटुंब वास्तव्याला आहे. तिथंच हा प्रकार घडला आहे. लिपी हिच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. घरात सुसाइड नोट सापडल्याचंही सांगण्यात येत आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपासाला सुरु केला आहे. विकास रस्तोगी हे राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आहेत. त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी या चलन विभागात सचिव आहेत.प्राथमिक माहितीनुसार, लिपी रस्तोगी ही वकिलीचं शिक्षण घेत होती. शैक्षणिक कामगिरीच्या चिंतेत ती होती असं सांगितलं जात आहे. पहाटे चार वाजताच्या सुमारास तिनं इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. तिच्या खोलीत सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं लिहिल्याची माहिती समोर आली आहे. कफ परेड पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.