महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांच्या २७ वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबई घडली. मुंबईत नरिमन पॉइंट येथील मंत्रालयासमोरील सुनीती नावाच्या इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन आयएएस दाम्पत्याच्या मुलीनं उडी घेतली. लिपी रस्तोगी असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. घरात पोलिसांना एक सुसाइड नोट देखील सापडली आहे.
आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
ज्या इमारतीत ही घटना घडली तिथं आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. विकास रस्तोगी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणचे सचिव आहेत. तर राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव पदावर कार्यरत आहेत. लिपी रस्तोगी ही वकिलीचं शिक्षण घेत होती. अभ्यासात गती नसल्याची चिंता तिला सतावत होती अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. कफ परेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सुसाइड नोटमध्ये काय?लिपी हिनं पहाटे चार वाजताच्या सुमारात इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. जीटी रुग्णालयात तिला नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी मृत घोषीत केलं. पोलिसांनी तिच्या खोलीचा तपास केला असता एक सुसाइड नोट सापडली आहे. त्यात माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असं लिहिल्याचं समोर आलं आहे. अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.