मुंबई : शहर-उपनगरात पालिकेकडून आवाहन करूनही साठवणुकीचा बर्फ रस्त्यावरील व उपाहारगृहातील पेय पदार्थांसाठी वापरला जात असल्याचे वारंवार उघड झाले आहे. त्यानंतर, मागच्या आठवड्यात लिंबू सरबताचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला, त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने बर्फ आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. शहर-उपनगरातील २४ वॉर्ड्समधून घेण्यात आलेल्या २५० बर्फाच्या नमुन्यांपैकी २१० नमुने सदोष आढळले आहेत, तर २०४ लिंबू सरबताच्या नमुन्यांपैकी १५७ नमुने सदोष आढळले आहेत. त्याचप्रमाणे, विविध आजारांना निमंत्रण देणारे ई कोलाय जीवाणू तब्बल बर्फ नमुन्यांत आढळले आहेत.
उन्हाळ्यांच्या दिवसात रस्त्यांवरील थंडगार पेयपदार्थाच्या गाड्या आणि त्यांच्यासमोरील गर्दी वाढू लागते. भर उन्हात गारेगार पेयपदार्थासाठी मोठ्या प्रमाणात बर्फ वापरला जातो. त्याचप्रमाणे, लहान-मोठ्या उपाहारगृहांमध्येही हाच बर्फ वापरला जात असल्याचे आढळले आहे. दर वर्षी महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडून या बर्फाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. या वेळी आरोग्य विभागाने बर्फ विक्रेते, उपाहारगृह, उसाच्या रसाची दुकाने, बार, रस्त्यावरील गोळेवाले, पेयपदार्थ विक्रेते, फळांचे रसविक्रेते, लस्सी, ताक-लिंबू सरबत विक्रेते, तसेच फास्ट फूड विक्रेते, डेअरी यांच्याकडील बर्फाचे नमुने तपासले आहेत.
उन्हाळ्यात पाण्याची तहान लागते, त्यावर बर्फ हा उपाय नाही. बर्फाचे ९० टक्क्यांहून अधिक नमुने खाण्यास अयोग्य असल्याचे दर वर्षी आढळते. त्यामुळे बाहेरचा बर्फ टाळावा, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले. पालिकेने घेतलेल्या नमुन्यांपैकी खाण्या-पिण्यास योग्य असे बर्फ व लिंबू सरबताचे नमुने आहेत. त्यामुळे ई-कोलायचा धोका सामान्यांनी वेळीच ओळखला पाहिजे. बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत असू द्या. पालिकेकडून पुरविण्यात येणारे पाणी शुद्ध असते. ते स्वच्छ बाटल्यांमध्ये न्यावे, असा सल्लाही त्यांनी दिली.
ई-कोलाय म्हणजे काय?मानवी विष्ठेमध्ये ई-कोलाय हे जीवाणू आढळतात. या जीवाणूंच्या संसर्गामुळे गॅस्ट्रो (अतिसार), जुलाब, कॉलरा, कावीळ, विषमज्वर यांसारखे जलजन्य आजार होऊ शकतात.