मुंबई : डी.एन. नगर ते मंडाळे या मेट्रो दोन मार्गिकांच्या रखडलेल्या कामाची निविदा प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. तर, आयकॉनिक पुलांच्या संकल्पचित्रांचे अनावरण होऊन वर्ष लोटले. त्यानंतर आता या दोन्ही कामांच्या एकत्रीकरणामुळे कामाची व्याप्ती वाढणार असल्याचा साक्षात्कार एमएमआरडीएला झाला आहे. त्यानंतर मेट्रो दोन ब मार्गिकेवरील तीन निविदा तडकाफडकी रद्द करण्यात आल्याने आॅक्टोबर, २०२२ पासून ही मार्गिका कार्यान्वित करण्याचे नियोजन अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.मेट्रो दोन ब या मार्गिकेच्या तीन टप्प्यांतल्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) फेब्रुवारीत बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर रखडलेले ९३ टक्के काम मार्गी लावण्यासाठी नवा कंत्राटदार नियुक्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दोनदा काढलेल्या निविदांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढाव्या लागल्या. त्यात पाच निविदाकार तांत्रिक आघाडीवर यशस्वी ठरले असून आर्थिक देकार उघडणे बाकी असल्याचे समजते. तर, दोन दिवसांपूर्वी एमएमआरडीएने मंडाळे डेपो, मेट्रो पूल आणि मेट्रो स्थानक या तिन्ही कामांच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.याच मार्गिकेवर वाकोला नाला, कलानगर आणि मिठी नदी या तीन ठिकाणी या ‘केबल ब्रिज’च्या उभारणीचा एमएमआरडीएचा मानस आहे. जुलै, २०१९ मध्ये त्याच्या संकल्पचित्राचे अनावरण झाले तेव्हा १८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, सप्टेंबरमध्ये त्यासाठी २३१ कोटींची लघुत्तम बोली लावण्यात आली. त्यामुळे फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या. २८ जुलै ही निविदा सादर करण्याची शेवटची तारीख होती. परंतु, मेट्रो दोन ब मार्गिकेच्या कामांची निविदा रद्द झाल्यामुळे आयकॉनिक पुलांच्या निविदांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कलात्मक सौंदर्यवृद्धीचे कारणआयकॉनिक पुलांचा मार्गिकेमध्ये झालेला समावेश आणि मेट्रो दोन बच्या मूळ कामांत झालेली वाढ यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करत असल्याचे एमएमआरडीएचे सहआयुक्त बी.जी. पवार यांनी सांगितले. परंतु, प्रत्येक कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सल्लागार नेमणाºया एमएमआरडीएला या वाढीव कामाचा अंदाज शेवटच्या टप्प्यात कसा आला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यावर ‘पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये कलात्मक सौंदर्य निर्माण करण्याचे प्रयत्न’ असे गोंडस कारण एमएमआरडीएने टिष्ट्वट करून दिले आहे.
आयकॉनिक पुलांनी बिघडवले मेट्रो २ ब चे गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 3:04 AM