मुंबईतील घोड्यांची ट्राम ते ई-एसी बस...! बेस्ट उपक्रमाचा १५० वर्षांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:39 AM2024-05-10T09:39:57+5:302024-05-10T09:42:03+5:30
२०२५ मध्ये पर्यावरणपूरक ई-बसचे लक्ष्य.
मुंबई :मुंबईसह ठाणे, मीरा रोड भाईंदर, नवी मुंबईपर्यंत भक्कम सार्वजनिक वाहतुकीचे जाळे असलेल्या बेस्ट उपक्रमाला गुरुवार, ९ मे रोजी १५० वर्षे पूर्ण झाली, घोड्यांनी ओढल्या गेलेल्या ट्रामने बेस्ट सेवेचा प्रारंभ झाला, अवघे तीन आणे तिकीट असलेली पहिली ट्राम कुलाब्यापासून क्रॉफर्ड मार्केटमार्गे पायधुनी, तर दुसरी बोरीबंदरपासून काळबादेवीमार्गे पायधुनीपर्यंत धावली. पुढे या ट्रामचे रूपांतर हे इलेक्ट्रिक ट्राममध्ये झाले. पुढे काळानुरूप अनेक स्थित्यंतरे 'बेस्ट'ने अनुभवली. आज बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील व स्वमालकीच्या अशा साध्या, वातानुकूलित (एसी) ई-बस, एसी डबल डेकर अशा विविध एकूण ३,०३८ बस प्रवाशांच्या सेवेत आहेत, सध्याच्या धोरणानुसार २०२५ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक असणार आहेत. सध्याच्या धोरणानुसार २०२५ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक असणार आहेत.
'बेस्ट'च्या १५० वर्षांच्या निमित्ताने आणिक बस आगारातील वस्तुसंग्रहालयात प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यात ब्रिटिशकालीन ट्राम ते आतापर्यंतच्या एसी बसचा प्रवास उपक्रमाकडून उलगडण्यात आला आहे.
बॉम्बे ट्रॉमवेज कंपनी लिमिटेड या अमेरिकन कंपनीने सुरू केलेली ट्रामसेवा मुंबईकरांच्या चांगलीच पसंतीस पडली. पहिल्याच दिवशी ५१ प्रवाशांनी ट्रामने प्रवास केला. मात्र कालांतराने मुंबईची लोकसंख्या वाढू लागली तशी ट्रामची गती मंदावली आणि ट्रामला पर्याय म्हणून बेस्टच्या बस रस्त्यावर धावू लागल्या. आता एसी बसही धावत आहेत.
१) मुंबईत शेवटची ट्राम ३१ २ मार्च १९६४ पोरी बंदर ते दादर टीटी दरम्यान धावली, यानंतर बेस्ट उपक्रमामध्ये विविध प्रकारच्या बसगाड्यांचा समावेश करण्यात आला. त्यात मुख्यतः दुमजली. दुमजली ओपन डेक, आर्टिक्युलेटेड बसगाड्या, मिडी बसगाड्या, वातानुकूलित एकमजली व दुमजली बसगाड्या आहेत.
२) घोड्याने ओढणाऱ्या ट्रामपासून ते डिझेल-इलेक्ट्रिक हायब्रिड एसीबस ते प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बसपर्यंत, इतर कोणत्याही वाहतूक संस्थेने दिल्या नसतील इतक्या विविध प्रकारच्या बस व तितक्याच प्रकारच्या वाहतूक सेवा बेस्टने मुंबईकरांना आजवर दिल्या आहेत आणि पुढेही देत राहणार आहे. - यतीन पिंपळे,
३) प्रवाशांच्या व ड्रावव्हर कंडक्टरच्या सोयी लक्षात घेऊन आसनव्यवस्था, बसच्या दरवाजांची स्थाने, आकार, रंगसंगती, दर्जा आदींमध्ये बदल केला आणि बसचे रंगरूप पालटू लागले.
प्रतिकृती वेधतेय लक्ष-
१) बेस्ट संग्रहालयात आदिल दिवेचा यानी मुंबईतील बेस्टचा प्रवास, ट्रामची बनविलेली प्रतिकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
२) हे शहरातील चलचित्र बेस्टला मुंबईची लाइफलाइन का म्हटले जाते. याची जाणीव करून देते. चलचित्राची प्रतिकृती बनविण्यासाठी दिवेचा यांना चार ते पाच दिवस लागले.
'बेस्ट'च्या चाहत्याची भेट-
संजय रोहराम हे मागील काही वर्षे ऑस्ट्रेलियात राहत असून, ते बेस्ट बसगाड्यांचे चाहते आहेत. आतापर्यंत जगभरातील विविध प्रकारच्या बसची ५० हुन अधिक मॉडेल्स त्यांनी जमविली आहेत. बेस्टने भरवलेल्या प्रदर्शनाला त्यांनी गुरुवारी आवर्जून भेट दिली. बेस्ट'चे टायगर एसडी हे मॉडेल त्यांच्या लहानपणाची आठवण असून ते त्यांनी अधिक प्रिय असल्याचे सांगितले. देशात बेस्ट'ला तोड नाही. मात्र बेस्टने आपला ताफा वाढविण्याची गरज असून, सामान्यांना दिलासा द्यायला हवा, असे ते आवर्जून म्हणाले.