आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पालकांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 07:25 AM2020-03-20T07:25:12+5:302020-03-20T07:25:24+5:30
परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे."
मुंबई : आयसीएसई दहावीची परीक्षा ३० मार्चला तर बारावीची परीक्षा ३१ मार्चला संपणार होती; मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आयसीएसई मंडळाने या दोन्ही परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गेरी अराथून यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे."
एमएचआरडी, सीबीएसई आणि नॅशनल टेस्ट एजन्सीने सर्व परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय बुधवार, १८ मार्च रोजी घेतला. या पार्श्वभूमीवर आयसीएसई मंडळाने हा निर्णय घेतला. दरम्यान, ज्या विषयांच्या परीक्षा झालेल्या आहेत, त्यांची पेपर तपासणी शिक्षक घरातूनच करतील.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर मंडळांच्या परीक्षा पुढे ढकलल्या जात असताना राज्य मंडळाकडून अद्याप दहावीच्या परीक्षा आणि शिक्षकांना शाळेकडून देण्यात येणाऱ्या सुट्ट्या याबाबत स्पष्ट निर्णय घेण्यात न आल्याने शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तसेच संतापाची भावना निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया भाजप शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी दिली.
शिक्षकांमध्ये संताप
शिक्षकांनी शाळेत येऊ नये, असे शिफारसपत्र राज्याच्या शिक्षण सचिवांना पाठविले. गुरुवारी संध्याकाळपर्यंत सचिवांनी निर्णय न घेतल्याने पुन्हा शिक्षकांना शुक्रवारी शाळेत येण्याच्या सूचना शाळांकडून दिल्या आहेत. त्यामुळे लोकलच्या गर्दीतून शाळेत यावे लागणार असल्याने शिक्षण विभागाविरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याची प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत.