आयसीटी कर्मचारी वेतनश्रेणी भ्रष्टाचार
By admin | Published: August 4, 2015 02:36 AM2015-08-04T02:36:28+5:302015-08-04T02:36:28+5:30
माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील काही तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनश्रेणी लागू करताना गैरव्यवहार झाला. गैरव्यवहाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले
मुंबई : माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील काही तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनश्रेणी लागू करताना गैरव्यवहार झाला. गैरव्यवहाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले. मात्र प्रकरणाला पाच वर्षे उलटल्यानंतरही उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल उद्याप गुलदस्त्यातच असल्याचा आरोप मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने केला आहे.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणी १ जानेवारी २००६ पासून लागू करण्याचा निर्णय ७ आॅक्टोबर २००९ रोजी घेतला. त्या वेळी आयसीटीमधील काही तांत्रिक पदांच्या वेतनश्रेणीमध्ये छेडछाड करून अवास्तव वाढ केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक यांनी ३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. त्या अनुषंगाने आयसीटीचे संचालक यांच्या मान्यतेने सहा सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने तांत्रिक पदांवर असलेल्या २० कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यात समिताला ठोस पुरावा मिळाला नाही, मात्र कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीत गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.
वेतनश्रेणी वाढीच्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ठोस पुरावा मिळाला नसला तरी काही तरी गैरव्यवहार असल्याचा निष्कर्ष समितीने काढला. तसा अहवालही समितीने आयसीटीच्या कुलसचिवांना दिला. कुलसचिवांनी त्याची दखल घेत संस्थेची बदनामी होऊ नये, म्हणून या प्रकरणाची शासन स्तरावर उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या उपसचिवांना ६ मे २०१० रोजी पत्र लिहिले. मात्र पाच वर्षे उलटल्यानंतरही या प्रकरणाची चौकशी झालीच नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. कारण चौकशी झाली असेल, तर त्याचा अहवाल का दडपण्यात आला, असा सवाल संघटनेने विचारला आहे. (प्रतिनिधी)