आयसीटीतील गैरव्यवहारांच्या चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 06:10 AM2019-01-12T06:10:12+5:302019-01-12T06:10:53+5:30
ज्येष्ठ सनदी अधिकारी मीता राजीवलोचन यांनी अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठविला होता.
यदु जोशी
मुंबई : माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) प्राध्यापक अरविंद लाली यांच्या कंपनीलाच कोट्यवधी रुपयांची पुरवठ्याची कंत्राटे दिल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल कार्यालयाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला दिले. यासंदर्भात मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने राज्यपालांकडे तक्रार केली होती.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी लोकमतला सांगितले की, राज्यपालांकडून आदेश आल्यानंतर चौकशीसंदर्भातील पत्र आम्ही कुलगुरू डॉ. जी. डी.यादव यांना पाठविले आहे. आयसीटीमध्ये सहाय्यक कुलसचिव (वित्त व लेखा) म्हणून कुलगुरुंच्या मर्जीतील सचिन कदम यांची नियमबाह्य नियुक्ती केल्याची तक्रार कर्मचारी संघाने केली आहे. कदम यांना आयसीटीच्या छाननी समितीने अपात्र ठरविले होते. तरीही त्यांची नियुक्ती करण्यात आली.
ज्येष्ठ सनदी अधिकारी मीता राजीवलोचन यांनी अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठविला होता. तरीही कदम हे आजपर्यंत या पदावर कार्यरत आहेत. आयसीटीमध्ये दीपक जेडिया हे विशेष कार्य अधिकारी आहेत. त्यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचे कर्मचारी संघाचे म्हणणे आहे. आयसीटीमध्ये प्रयोगशाळा परिचराची १५ पदे जाहिरात देऊन भरण्यात आली त्यास सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली नव्हती. अनेक कामे दिली निविदेविना आयसीटीमध्ये अनेक कंत्राटदार ठाण मांडून आहेत. निविदांविना त्यांना कंत्राटे दिली जातात, अशा तक्रारी आहेत. या तक्रारींची निष्पक्ष चौकशी झाली तर सगळे घोटाळे समोर येतील, असे कर्मचारी संघाचे म्हणणे आहे.
प्रा.लाली यांनी त्यांच्या कंपनीमार्फत पुरवठ्याची कंत्राटे मिळविली याची आपल्याला कल्पना नव्हती. संबंधित कंपनी कोणाची आहे हे मला माहिती नव्हते. चौकशी समितीमार्फत चौकशी सुरू आहे. येत्या आठ दिवसात चौकशी अहवाल येईल व त्या आधारे कारवाई केली जाईल.
- डॉ. जी. डी. यादव, कुलगुरू आयसीटी