- मनीषा म्हात्रेमुंबई : दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फोडून विद्यार्थ्यांना विकणाऱ्या मुंब्रा-यातील शिक्षकासह एकूण ११ जणांविरोधात दाखल गुन्ह्यात धरपकड सुरु असताना गुरूवारी दहावीचा आयसीटीचा (माहिती संप्रेषण तंत्रज्ञान) पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. साकीनाका येथील काजुपाडा परिसरातील असलेल्या सेंट जुड हायस्कूलमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. फिरोज अन्सारी (४२), मझमिल काझी (३२) अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. दोघेही मिरारोडचे असून खासगी शिकवणी घेतात. गुरुवारी आयसीटीचा पेपर संपल्यानंतर एक १५ वर्षाची विद्यार्थीनी घोळका करून पेपर तपासत होती. तेव्हा जवळील प्रश्नपत्रिका आणि बोर्डाकडून देण्यात आलेली प्रश्नपत्रिका सारखी असल्याचे दिसून आले. ही बाब तेथील शिक्षक वनिता शेट्टी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी मुलीला ताब्यात घेतले. दोन्ही पेपर ताब्यात घेत याबाबत बोर्डाला कळविले. पेपर फुटल्याची खात्री होताच त्यांनी याबाबत साकीनाका पोलिसांना कळविले. घटनेची वर्दी लागताच साकीनाका पोलीस तेथे दाखल झाले. त्यानी मुलीकड़े चौकशी केली. तिच्याकडील मोबाईल क्रमाकांच्या आधारे पोलिसांनी अन्सारी आणि काझीला अटक केली. मुलीने आणखीन पाच मुलींना प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवरून पाठवल्याचे उघड झाले. त्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. अन्सारी आणि काझीची पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन परीक्षेच्या वेळी त्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्याचे काम दोघे करत असल्याने त्याला मोठी मागणी होती. त्यामुळे यामागे अनेक जण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सामाजिक शास्त्र पेपर फुटीप्रकरणाला टिटवाळा कनेक्शन दहावीच्या सामाजिक शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिकाफोडून विद्यार्थ्यांना विकणाऱ्या मुंब्रा-यातील शिक्षकासह एकूण ११ जणांविरोधात अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिक्षक असलेल्या फिरोज अब्दुल मजीद खान(४७) याने सामाजिक शास्त्रासह दहावीच्या तब्बल पाच प्रश्नपत्रिकाफोडून विकल्याची धक्कादायक बाब अंबोली पोलिसांच्या चौकशीतून उघड झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस अधिकारी दया नायक यांच्या पथकाने मंगळवारी फिरोझ खान, इम्रान शेख आणि अन्वरूमल शेख या तिघांना अटक केली. फिरोझ हा मुंब्रयाच्या पॅरेडाइज शाळेत गणित शिकवत असून स्वत:चा क्लासही चालवितो. त्याने दहावीचे पाच पेपर या क्लासमधील शिक्षक रोहित सिंग याला व्हॉट्सअॅपवरून पाठविल्याचे उघड झाले. रोहितलाही बुधवारी अटक केली आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. याप्रकरणी टिटवाळा कनेक्शन समोर येत आहे. आज टिटवाळा पोलीस अंबोली पोलिसांची भेट घेणार आहेत.
दहावीचा सामाजिक शास्त्रापाठोपाठ आयसीटीचाही पेपर फुटला, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 1:38 AM