टीबी रुग्णालयात सुरू होणार आयसीयू
By admin | Published: March 9, 2016 04:38 AM2016-03-09T04:38:49+5:302016-03-09T04:38:49+5:30
टीबीसाठी तब्बल ४० वर्षांनी आलेले नवीन औषध- बेडाक्विलिन आता शिवडी टीबी रुग्णालयातील ‘एक्स्टेंसिव्हली ड्रग्ज रझिस्टंट’ (एक्सडीआर) रुग्णांना देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे
मुंबई : टीबीसाठी तब्बल ४० वर्षांनी आलेले नवीन औषध- बेडाक्विलिन आता शिवडी टीबी रुग्णालयातील ‘एक्स्टेंसिव्हली ड्रग्ज रझिस्टंट’ (एक्सडीआर) रुग्णांना देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. या रुग्णांना नवीन औषधाचा त्रास झाल्यास तत्काळ त्यांना उपचार मिळावेत, यासाठी पहिल्यांदाच शिवडी टीबी रुग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू करण्यात येणार आहे.
औषधाला दाद न देणाऱ्या ‘मल्टि ड्रग्ज रजिस्टंट (एमडीआर), ‘एक्स्टेंसिव्हली ड्रग्ज रजिस्टंट’ (एक्सडीआर) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या रुग्णांकडून संसर्ग झाल्यावर दुसऱ्या व्यक्तीला थेट एमडीआर अथवा एक्सडीआर टीबीची लागण होते. टीबीचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी ‘बेडाक्विलिन’ औषध प्रायोगिक तत्त्वावर शिवडी टीबी रुग्णालयातील एमडीआर, एक्सडीआर रुग्णांना देण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यात औषध देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्या रुग्णाला आपत्कालीन उपचारांची आवश्यकता असल्यास अतिदक्षता विभागात उत्तम दर्जाचे उपचार मिळू शकतात. त्या रुग्णाची प्रकृती स्थिर होऊ शकते, यासाठीच हा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. एक्सडीआर आणि एमडीआर रुग्णांसाठीच हा अतिदक्षता विभाग वापरण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र ननावरे यांनी दिली.
शिवडी टीबी रुग्णालयात ५०० रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी १०० रुग्ण एमडीआर टीबीचे उपचार घेत आहेत. बेडाक्विलिन औषधाचे दुष्परिणामही काही प्रमाणात दिसून आले आहेत. पण, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या औषधाचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णाला तत्काळ औषध मिळणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत टीबी रुग्णालयात अतिदक्षता विभाग नव्हता. या रुग्णालयातील रुग्णाला जास्त त्रास झाल्यास, अतिदक्षता विभागाची आवश्यकता असल्यास केईएम रुग्णालयात पाठविले जायचे. सध्या अतिदक्षता विभागात दोन खाटा असणार आहेत. त्यानंतरच्या काळात १० खाटा सुरू करण्यात येणार असल्याचे एका डॉक्टरने सांगितले. (प्रतिनिधी)