दहावी, बारावीच्या ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा परीक्षा न देण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:06 AM2021-03-09T04:06:50+5:302021-03-09T04:06:50+5:30

सर्वेक्षणातील निष्कर्ष; ऑनलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थी, पालकांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेनाचा पुन्हा वाढणारा संसर्ग आणि शिक्षण ...

The idea of not giving exams to more than 50,000 students of 10th and 12th standard | दहावी, बारावीच्या ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा परीक्षा न देण्याचा विचार

दहावी, बारावीच्या ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा परीक्षा न देण्याचा विचार

Next

सर्वेक्षणातील निष्कर्ष; ऑनलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थी, पालकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेनाचा पुन्हा वाढणारा संसर्ग आणि शिक्षण मंडळ ऑफलाईन परीक्षांवर ठाम असल्याने दहावी, बारावीचे जवळपास ५२ हजार ५५८ विद्यार्थी यंदा परीक्षा न देण्याचा विचार करीत आहेत. परीक्षेवर ठाम असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६९ हजार ७५२ म्हणजे जास्त असली तरी अद्याप परीक्षा द्यायची की नाही, याबाबत तब्बल ३६ हजार २९१ विद्यार्थी संभ्रमात आहेत.

राज्यात युट्युबवरून मोफत शिक्षण देणाऱ्या विविध अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, पालकांनी परीक्षेआधी एक सर्वेक्षण केले असून, त्याला राज्यातून तब्बल १ लाख ५८ हजार ६०१ विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. राज्याच्या ३६ जिल्ह्यांतील पालक व विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे शिक्षक दिनेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.

राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १ लाख ५८ हजार ६०१ विद्यार्थी सर्वेक्षणात सहभागी झाले होते. त्यातील ७१ टक्के म्हणजे १ लाख १२ हजार ७९४ विद्यार्थी बारावीचे, तर ३६ हजार १३४ विद्यार्थी दहावीचे होते. ९ हजार ६७३ विद्यार्थी हे इतर इयत्तांचे होते. ऑनलाईन परीक्षा व्हावी, असे मत नोंदवत असतानाच वर्षभर चाललेल्या ऑनलाईन तासिकांबाबत असमाधानी असल्याचे मत ६९ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

कोणत्या माध्यमातून परीक्षा घेण्यात यावी किंवा परीक्षा पद्धती काय असावी, या प्रश्नाला ६१ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घ्यावी, असा प्रतिसाद दिला. २० टक्के विद्यार्थ्यांना कशीही परीक्षा घेतली तरी चालेल, तर १९ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा लेखीच असावी, असे मत व्यक्त केले. परीक्षा लेखी झाल्यास केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीची सुविधा नसल्याचे ५३ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एप्रिल - मे महिन्यांत लेखी परीक्षा घेण्याबाबत ७९ टक्के विद्यार्थ्यांनी समाधानी नसल्याचे नमूद केले. परीक्षेसाठी अजून अभ्यासक्रम कमी करावा, असे मत ८४ टक्के जणांनी नोंदवले.

* शिक्षण मंडळाच्या निर्णयावर असमाधानी

सध्या कमी केलेला २५ टक्के अभ्यासक्रम, एप्रिल - मे मधील परीक्षा आणि परीक्षेची ऑफलाईन पद्धती या राज्य शिक्षण मंडळाच्या निर्णयावर आपण समाधानी आहात का, या प्रश्नावर ७९ टक्के विद्यार्थ्यांनी म्हणजे १,२४,७६९ विद्यार्थ्यांनी ‘नाही’ असे उत्तर नोंदविले असून, फक्त २० हजार १४४ विद्यार्थी यावर समाधानी असल्याचे सर्वेक्षणातून समाेर आले. १३ हजार ६८८ विद्यार्थी अजूनही गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत.

* विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या

राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या मनस्थितीचा विचार करून त्यांच्या मतांचा विचार करावा आणि ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा. काेराेनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार प्राधान्याने करून पालकांनाही दिलासा द्यावा.

- अनुभा सहाय,

अध्यक्षा, इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशन

......................

Web Title: The idea of not giving exams to more than 50,000 students of 10th and 12th standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.