शरणागतीचा विचार विद्याधरने ऐनवेळी बदलला
By Admin | Published: December 16, 2015 02:48 AM2015-12-16T02:48:46+5:302015-12-16T02:48:46+5:30
हेमा उपाध्याय आणि अॅड. हरीश भंबानी यांच्या खुनातील मुख्य आरोपी विद्याधर राजभर हा पोलिसांना शरण जायचे आहे, असे सांगून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेत बसलाही होता, पण ऐनवेळी
- डिप्पी वांकाणी, मुंबई
हेमा उपाध्याय आणि अॅड. हरीश भंबानी यांच्या खुनातील मुख्य आरोपी विद्याधर राजभर हा पोलिसांना शरण जायचे आहे, असे सांगून मुंबईला जाण्यासाठी रेल्वेत बसलाही होता, पण ऐनवेळी त्याने विचार बदलला आणि तो भुसावळला उतरला. ही माहिती या खुनातील त्याचा साथीदार साधू राजभरनेच पोलिसांना दिली. साधू राजभरला सोमवारी वाराणसीत उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.
साधूने दिलेल्या माहितीनुसार विद्याधरने भुसावळला विचार बदलला आणि तेथे त्याने पत्नीला बोलावून घेतले व ते आता दोघेही फरार आहेत. विद्याधरने चक्रवाढ दराच्या व्याजाने अनेक कर्जे घेतली असून त्यांची परतफेड होऊ शकत नसल्यामुळे आपण ठार मारले जाऊ असा विचार करून त्याला नैराश्य आले होते, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. पोलिसांनी मंगळवारी या खून प्रकरणात आणखी तीन जणांना अटक केली. त्यात टेम्पोचालक आणि दोन कामगारांचा समावेश आहे. या तिघांचाही खुनात सक्रिय सहभाग आहे.
टेम्पोचालक विजय राजभरसह विद्याधरचे दोन कामगार प्रदीप आणि आझाद राजभर यांना कांदिवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. विजय राजभरच्या टेम्पोतून हेमा उपाध्याय आणि हरीश भंबानी यांचे मृतदेह नाल्यात नेऊन टाकण्यात आले होते. या तिघांना १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. साधू राजभरला बुधवारी मुंबईत आणण्यात येऊन न्यायालयात हजर केले जाईल. विद्याधर साधू राजभरसह उत्तर प्रदेशकडे निघालेल्या रेल्वेत बसला होता. त्याच्यासोबत यावेळी हेमा उपाध्याय व हरीश भंबानींचे अनेक बँकांचे कार्ड्स होते. परंतु विद्याधरने मी पोलिसांना शरण यायचे ठरविल्याचे सांगून साधूला तू आता लपून राहा, असे सांगितले. विद्याधर इटारसी रेल्वे स्थानकावर उतरला आणि मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत बसला. त्याच्या मुंबईकडील प्रवासात भुसावळपर्यंत आम्हाला त्याच्या फोनचे सिग्नल्स मिळत होते, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्याधर राजभरने त्याच्या ओळखीच्यांकडून १५ लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे. तो पाच लाखांचे कर्ज मागायचा व अवघ्या चार महिन्यांत सहा लाख परत करीन, असे आश्वासन द्यायचा. जर हे पैसे परत करू शकलो नाही तर दरमहा अतिरिक्त २५ हजार रुपये देईन, अशीही तयारी तो दाखवायचा. त्याने ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना तो ते परत करू शकला नाही आणि त्याला हेमाकडून जी देय रक्कम होती तीदेखील ती देत नव्हती. या कोंडीमुळे तो लोकांना भेटू शकत नव्हता व त्यामुळे त्याला कमालीचे नैराश्य आले होते. त्याचवेळी हेमाही त्याला अपमानित करीत होती, यामुळे त्याने तिला ठार मारायचे ठरविले असावे, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.
कांदिवलीतील दोन घरे सील
कांदिवलीतील लालजी पाडा भागातील गणेश नगर येथील दोन घरांना पोलिसांनी सील ठोकले आहे. याच घरांमध्ये विद्याधर राजभर फॅब्रिकेशनचा व्यवसाय करायचा. पण या भागातील शेजारी या प्रकरणाबाबत फारसे भाष्य करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणी नेमके काय घडले, याची विचारणा केली
असता शेजाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला तर काही जणांनी आपण कामासाठी दिवसभर बाहेर असल्याने काय झाले याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. सदर प्रतिनिधीने मंगळवारी या भागाला भेट दिली असता सील केलेल्या या दोन घरांच्या परिसरात तीन कॉन्स्टेबल उभे होते. येथील नागरिकांशी बोलू नका, त्यांना काही विचारू नका. आमचे साहेब या भागात येत आहेत. असा माहितीवजा सल्ला या कॉन्स्टेबलने दिला. राजभर याच्याबाबत आपण काही बोललो तर पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही स्थानिकांच्या चेहऱ्यावर होती.
या घरासमोरील एका महिलेला याबाबत विचारले असता ती म्हणाली की, आम्हाला काहीही माहिती नाही. आमच्या घराचे दार २४ तास बंद असते. आणखी एका शेजाऱ्यानेही बोलण्यास नकार देत सांगितले की, मी सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडतो. तर कामाहून रात्री उशिरा घरी येतो. त्यामुळे आपल्याला या प्रकरणातील काहीच माहिती नाही.
याच भागातील एका महिलेने मात्र थोडी माहिती दिली. धाग्यात मोती ओवतानाच या महिलेने सांगितले की, काही व्यक्ती त्या घरात राहत होत्या. तेथे एक महिलाही असायची. आपल्या मुलासोबत ती राहत होती. पण त्यांच्याबाबत आणखी माहिती नाही.
श्रीमुखात दिल्याने हत्या
हेमाने श्रीमुखात दिल्यामुळे तिची हत्या केल्याची कबुली विद्याधरने त्याच्या शेजाऱ्याला दिली होती. त्यातही डोक्यावर कर्जाचे डोंगर असलेल्या विद्याधरने २००८ मध्ये वडिलांच्या उपचारासाठी हेमाचा पती चिंतन उपाध्यायकडून ६ लाख रुपये घेतले होते. हे पैसे फेडणेही त्याला कठीण जात असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
चिंतनकडे जाणे बंद केले
चिंतन निर्दोष असल्याचे सांगणाऱ्या त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले की त्याच्या घरी आम्ही त्याचे लग्न व्हायच्या आधी नियमितपणे जात असू. पण हेमाशी त्याचे लग्न झाल्यानंतर तिच्या उद्धट व तापट स्वभावामुळे आम्ही त्याची भेट घ्यायचे थांबविले.
कधी अपेक्षा केली नव्हती
विद्याधर राजभरचे वडील चिंतन उपाध्यायचे खूप जवळचे होते. विद्याधर हे चिंतनच्या वडिलांचे नाव होते व राजभर यांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘विद्याधर’ ठेवले होते. चिंतनला अजून पोलिसांनी क्लीन चिट दिलेली नाही. चिंतनने ज्या विद्याधरला मी लहानाचे मोठे होताना बघितले तो असे काही करील अशी कधीही मी अपेक्षा केली नाही, असे सांगितले.
चित्रकार, छायाचित्रकार आणि मांडणी शिल्पकार म्हणून जगविख्यात असलेल्या हेमा उपाध्याय यांच्या हत्येने कलजगतावर शोककळा पसरली आहे. स्वतंत्र वर्तमानातील विचार मांडणारी कलावंत असे व्यक्तिमत्त्व असलेल्या हेमाला कला क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
चिंतनचे वडील माझे चांगले मित्र असल्याने हेमा आणि चिंतन यांच्याशी चांगला परिचय होता. आमची शेवटची भेट चार वर्षांपूर्वी एका प्रदर्शनादरम्यान झाली होती. हेमाच्या हत्येने कलाजगताला मोठा धक्का बसला आहे.
- सुहाळ बहुळकर, सुप्रसिद्ध चित्रकार
हेमा ही संवेदनशील, वर्तमानातील कला मांडणारी कलावंत होती. ती मुक्त विचारांची होती. असे विचार मांडणाऱ्या कलावंतांची अशी निर्घृण हत्या होते, याचे दु:ख वाटते. मी
ज्या मुलांना शिक्षण दिले त्यापैकी अनेक जण तिच्या परिचयाचे
आहेत. त्यांच्याकडून नेहमीच तिच्या कलेचे कौतुक केले जायचे. तिची हत्या होणे म्हणजे कलेवरचा घात आहे.
- अनिल नाईक, ज्येष्ठ चित्रकार
हेमा उपाध्याय यांची हत्या होणे ही दुर्दैवी घटना आहे. अशाप्रकारे एका कलाकाराची हत्या होण्याच्या घटनेने मनात भीती निर्माण झाली आहे. अशा आरोपींवर कडक शासन होणे गरजेचे आहे.
- अच्युत पालव,
सुप्रसिद्ध सुलेखनकार
तिचे कलेबाबतचे काम, विचार, एकाग्रता हे खूप चांगले होते. ती मोकळ्या विचारांची होती. ती नेहमीच काही तरी वेगळे मांडण्याचा प्रयत्न करत होती.
- शिरीन गांधी, गॅलरिस्ट
१५ ते २० वर्षे कला क्षेत्रात स्वत:चा वेगळा असा ठसा हेमाने उमटविला होता. त्यात तिची हत्या होणे, ही खूप दु:खद आणि धक्कादायक घटना आहे.
- राज मोरे, कलाकार