Join us

पालिकेच्या कूपर रुग्णालयात आदर्श लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 9:47 PM

CoronaVaccination: टास्क फोर्सची पहिली बैठक पार पडल्यानंतर लसीकरण केंद्राची कार्यवाही जलद गतीने सुरु करण्यात आली आहे.

मुंबई - कोरोना विषाणूवरील लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने महापालिकेमार्फत पूर्वतयारी सुरू आहे. या लसीचा साठा आणि लसीकरण केंद्राचा यामध्ये समावेश आहे. या अंतर्गत पालिकेच्या विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात पाहिले लसीकरण केंद्र विकसित केले जात आहे. या केंद्राची प्रतिकृती इतर लसीकरण केंद्रांमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. एकूण आठ केंद्र उभारण्यात येणार आहेत.

टास्क फोर्सची पहिली बैठक पार पडल्यानंतर लसीकरण केंद्राची कार्यवाही जलद गतीने सुरु करण्यात आली आहे. लसीकरणासाठी परळचे केईएम, सायन, मुंबई सेंट्रल येथील नायर, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर, वांद्रे - भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई, घाटकोपरचे राजावाडी आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही आठ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

 

त्याचबरोबर कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पाच हजार चौरस फूट जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी प्रादेशिक लस स्टोअर (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही कोविड स्टोरेज सुविधा विकसित केली जाणार आहे. कोल्ड स्टोरेज सुविधा तयार करताना केंद्र सरकारच्या मानांकनानुसार कामगिरी, गुणवत्ता, सुरक्षितता आदींचे निकष समितीकडून वेळोवेळी पाळले जाऊन त्यानुसार परीक्षण केले जाणार आहे.

* केंद्र सरकारच्या नियमांनुसार निश्चित केलेल्या आठ केंद्रातील प्रत्येक केंद्राने तीन ते पाच आदर्श लसीकरण स्थळं निर्देशित करणे आवश्यक आहे. 

* मध्यवर्ती लससाठा शीतगृहातून कोविड - १९ लस  उपलब्ध झाल्यानंतर संबंधित रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधिक्षक हे लसीकरण यादी तयार करण्यासाठी संबधित कर्मचाऱ्यांची निवड करतील.

* आतापर्यंत सुमारे ८० हजार सेवकांचा डेटा कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. एकूण एक लाख २६ हजार ३७८ सेवकांचा डेटा अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे. 

* फ्रंटलाईन वर्कर्सचा डेटा एकत्रित करून २५ डिसेंबरपर्यंत कोविन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी समन्वय अधिकाऱयांकडे पाठविला जाणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या