रक्तदानातील द्विशतकी खेळीने ठेवला आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 05:29 AM2021-05-03T05:29:25+5:302021-05-03T05:30:06+5:30
व्यसन लावायचे असेल तर रक्तदानाचे लावा!
सुहास शेलार
मुंबई : तहान लागली की विहीर खोदायची, ही भारतीयांची जुनी सवय. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी सुरू झालेली धावपळ हे त्याचे ताजे उदाहरण. पण, हा उत्साह केवळ संकटकाळापुरता मर्यादित न राहता, प्रत्येक दात्याने आपल्या आयुष्याची पासष्टी ओलांडेपर्यंत रक्तदान केल्यास कधीच रक्तटंचाई जाणवणार नाही, असे मत लेलेकाका अर्थात विश्वेश लेले यांनी व्यक्त केले. त्यांनी आतापर्यंत तब्बल २२९ वेळा रक्तदान केले आहे.
दहिसरला राहणाऱ्या ६३ वर्षीय लेले काकांचा रक्तदानासाठीचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे. कोरोनाकाळातही त्यांनी चारवेळा रक्तदान केले. अठराव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. तरुणवयात ते दीड महिन्याच्या फरकाने रक्त द्यायचे. आता वयपरत्वे मर्यादा आल्यामुळे वर्षातून किमान तीन-चार वेळा तरी रक्तदान करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांचे कुटुंबही नियमित रक्तदान करते.
व्यसनांच्या आहारी गेलेल्यांना रक्तदानात बरेच अडथळे येतात. पण व्यसने ही शरीराची गरज नाही, ती आपल्या प्रत्येक अवयवाला हानी पोहोचवतात. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे केव्हाही चांगले. आजच्या धावपळीच्या जीवनात तंदुरुस्त राहण्याचे आव्हान प्रत्येक व्यक्तीसमोर उभे ठाकले आहे. पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि व्यसनांपासून दूर राहिल्यास आपण निरोगी जीवन जगू शकतो आणि निरोगी माणूसच रक्तदान करू शकतो. आपल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचत असेल, तर त्याहून मोठे पुण्यकर्म दुसरे नाही. प्रत्येक नागरिकाने विशेषतः तरुणांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. रक्तदान हे केवळ शिबिरांपुरते मर्यादित न राहता ते माणसांचे व्यसन बनले पाहिजे, असे मत लेले काकांनी व्यक्त केले.
गैरसमज टाळा; पुढाकार घ्या!
रक्तदान केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते, त्वचेवर परिणाम होतो, लोह-क्षार हे घटक नाहीसे होतात.. असे असंख्य गैरसमज वावटळीसारखे पसरले आहेत. पण, यातली प्रत्येक गोष्ट खोटी आहे. रक्तदानामुळे मानवी शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. कोणताही घटक नाहीसा होत नाही. याउलट नियमित रक्तदान केल्याने शरीरात नवे रक्त तयार होते. रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया आपोआप घडते. त्यामुळे गैरसमज टाळून प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे लेले काकांनी सांगितले.