आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार; शिक्षकांची नावे जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:06 AM2021-09-03T04:06:52+5:302021-09-03T04:06:52+5:30
मुंबई : ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार २०२० - २१’च्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालय ...
मुंबई : ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार २०२० - २१’च्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालय येथे जाहीर केली. माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस, त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून यादिवशी ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ने शिक्षकांना सन्मानित करण्यात येते.
शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहेत, त्यांचा गौरव करण्याची परंपरा १९७१पासून २ शिक्षकांना पुरस्कृत करुन सुरु झाली. नंतर वेळोवेळी यामध्ये बदल होऊन आजमितीस ५० आदर्श शिक्षकांना गौरविण्यात येते.
महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील आदर्श आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत असिधाराव्रत स्वीकारलेल्या ५० शिक्षकांना प्रत्येकी दहा, महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा देऊन महापौरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. निवड समितीने सिटी ऑफ लाॅस एंजलिस मनपा शाळा, मनमाला टँक रोड, स्टारसिटी सिनेमाजवळ, माहीम - माटुंगा येथे १३० शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून एकूण ५० शिक्षकांची महापौर पुरस्कारासाठी निवड केली.