Join us  

मंदिर व्यवस्थापनाचा पाण्याच्या नियोजनाचा आदर्श!

By admin | Published: May 08, 2016 2:46 AM

राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि मुंबई शहर- उपनगरातील पाणीसंकट ओळखून सर्व स्तरांतून गेल्या काही दिवसांपासून पाणीबचतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

मुंबई : राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि मुंबई शहर- उपनगरातील पाणीसंकट ओळखून सर्व स्तरांतून गेल्या काही दिवसांपासून पाणीबचतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. हॉटेल्स, महाविद्यालये, निवासी वसाहतींसोबतच आता शहरातील प्रमुख मंदिर व्यवस्थापनांनीही पाण्याच्या नियोजनाच्या पद्धतीचा अवलंब करीत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शहरातील श्रीसिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर आणि मुंबादेवी मंदिर या व्यवस्थापनांनी पाण्याच्या नियोजनाविषयी वेगळी व्यवस्था उभारली आहे. ग्रँटरोड येथील बाबुलनाथ मंदिर व्यवस्थापनाने दिवसातून एकदाच सकाळी ११.३० वाजता अभिषेक करण्याचे ठरविले आहे. एरव्ही दिवसभर या मंदिरात अभिषेक सुुरू असतो. मात्र, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी खारीचा वाटा उचलावा, असा विचार करून मंदिर व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, याद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होत असल्याची माहिती व्यवस्थापन प्रवक्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भुलेश्वर येथील मुंबादेवी मंदिर व्यवस्थापनाने बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी हात-पाय धुण्याची सोय असणाऱ्या पाण्याची सेवा बंद केली आहे. या माध्यमातून बऱ्याचदा पाण्याचा अपव्यय होतो. शिवाय, बरेचदा हे भक्त पाण्याचा नळही व्यवस्थित बंद करीत नसल्याने पाणी वाया जाते. यावर तोडगा म्हणून काही काळ हात-पाय धुण्याची सोय असणारे पाणी बंद करण्यात आले आहे, तसेच मंदिरातही कमीत कमी जलवापरावर भर असल्याचे मंदिर व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी सांगितले. प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिराने दैनंदिन पाण्याची गरज ओळखून, जून २०१० साली रेन हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पासाठी तीन लाख रुपये खर्च आला आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिराच्या शेजारी बांधण्यात आलेल्या प्रतीक्षालयात पाण्याचा साठा केला जातो. साठविलेले हे पाणी वर्षभर पुरते. या पाण्यावर जलशुद्धिकरणाची प्रक्रिया केली जाते. मंदिर, परिसरातील स्वच्छता आणि फ्लशिंगसाठी या पाण्याचा वापर केला जातो, अशी माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली.स्वच्छतेसाठी उपयोगसिद्धिविनायक मंदिराने रोज लागणाऱ्या पाण्याची सोय रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, उभ्या केलेल्या या प्रकल्पातून साठवलेल्या पाण्याचा उपयोग स्वच्छता व इतर कामांसाठी केला जातो.