मुंबई विद्यापीठात आयडीयाथॉन नवकल्पनांचे होणार स्टार्टअपमध्ये रुपांतर
By रेश्मा शिवडेकर | Published: March 14, 2024 04:52 PM2024-03-14T16:52:14+5:302024-03-14T16:52:26+5:30
विद्यापीठात २०१९ पासून एमयु- आयडियाज् इन्क्युबेशन सेंटर कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत विविध नव प्रतिभावंताच्या संकल्पनांना नवउद्योगांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.
मुंबई- मुंबई विद्यापीठाने नवकल्पना व नवसंशोधनांना स्टार्टअपमध्ये रुपांतर करण्यासाठी ‘आयडीयाथॉन १.०’ ची घोषणा केली आहे. विद्यापीठाच्या एमयु- आयडियाज् इन्क्युबेशन सेंटरने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे नवउद्योजकांना मदत व अर्थसहाय्य केले जाणार आहे. ‘आयडीथॉन १.०’ च्या माध्यमातून नवउद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य उपक्रमांमध्ये रुपांतर करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
विद्यापीठात २०१९ पासून एमयु- आयडियाज् इन्क्युबेशन सेंटर कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत विविध नव प्रतिभावंताच्या संकल्पनांना नवउद्योगांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या या इन्क्युबेशन सेंटरला महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून ५ कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ग्रीन टेक्नोलॉजी इमारतीमध्ये हे इन्क्युबेशन सेंटर कार्यरत आहे.
कसे सहभागी व्हाल
‘आयडीथॉन १.०’ या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांना त्यांच्या नवकल्पनांच्या सादरीकरणासाठी विद्यापीठाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘आयडीथॉन १.०’ मध्ये सहभागी होण्यासाठी https://tinyurl.com/MyIdeathon या लिंकवर अर्ज सादर केले जाऊ शकतात. या स्पर्धेमध्ये प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांच्या माध्यमातून छाननी केली जाणार असून विजेत्यांना रोख रक्कम, पारितोषिक आणि एका वर्षाचे सहाय्य मिळणार आहे. या स्पर्धेसाठी वयोगट आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची कोणतीही अट नसून सर्वच क्षेत्रातील नवोदितांसाठी ही स्पर्धा खुली असणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे नवनियुक्त संचालक डॉ. सचिन लढ्ढा यांनी सांगितले.