समाजमाध्यमांचा धोका ओळखा - परंजय गुहा ठाकुरता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 03:14 AM2019-11-29T03:14:27+5:302019-11-29T03:14:52+5:30

समाजमाध्यमे सामान्यांच्या घरात घुसून सामान्यांवर नियंत्रण ठेवत आहेत. हे सामान्य काय पाहतात, काय वाचतात, काय ऐकतात त्यावर देखरेख ठेवली जात आहे.

Identify the threat of the media - Paranjay Guha Thakurta | समाजमाध्यमांचा धोका ओळखा - परंजय गुहा ठाकुरता

समाजमाध्यमांचा धोका ओळखा - परंजय गुहा ठाकुरता

Next

मुंबई - समाजमाध्यमे सामान्यांच्या घरात घुसून सामान्यांवर नियंत्रण ठेवत आहेत. हे सामान्य काय पाहतात, काय वाचतात, काय ऐकतात त्यावर देखरेख ठेवली जात आहे. हे मनोरंजन म्हणून पाहिले जात असले तरी यातून अर्धसत्य समोर येत आहे़ शत्रुत्व जन्माला येत आहे, झुंडबळीची प्रकरणे घडत आहेत़ याची आव्हाने लक्षात घ्यायला हवीत. यातून काय दिले जात आहे, याबद्दल सतर्क राहायला हवे, असे आवाहन विचारवंत, लेखक परंजय गुहा ठाकुरता यांनी केले.

पाचवे मेरी पाटील स्मृती व्याख्यान आणि स्मृती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. चिपळूण येथील प्रयोगभूमी निवासी शाळेचे राजन इंदुलकर यांचा पाचव्या मेरी पाटील पुरस्काराने या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.२५ हजार रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘समाजमाध्यमांचा समकालीन भारतीय माध्यमांवर प्रभाव’ या विषयासंदर्भात बोलताना इंटरनेट आले तेव्हा दुर्बल लोकांना ताकद मिळेल़, लोकतंत्र मजबूत होईल, असे सांगण्यात येत होते. याची आठवण ठाकुरता यांनी करून दिली.

आज केवळ दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात हा कारभार आहे़ कोणीतरी हे वापरणाऱ्यांवर लक्ष ठेवत आहे हे लक्षात घ्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजमाध्यम हत्यार झाले आहे. हे एखाद्या नशेप्रमाणे झाले आहे. भांडवलशाहीचे हे नवे रूप आहे, असाही इशारा त्यांनी दिला.

गेल्या वर्षभरात ३० लोक झुंडशाहीचे बळी गेले. या प्रत्येक हत्येच्या मागे व्हॉट्सअ‍ॅप आहे. या माध्यमातून पाठविले जाणारे संदेश कुणी पाठविले, कुठे पोहोचले हे कळत नाही, असे सांगितले जाते. पेगॅससमुळे फोनमधील संदेशांवर सरकारची नजर होती हेही त्या वेळी लक्षात घ्यायला पाहिजे. युवावर्गाला समाजमाध्यमांचा धोका सांगणे गरजेचे आहे, असेही ठाकुरता यांनी उपस्थितांना सांगितले. या माध्यमांना तुमची विचारधारा कळत आहे. ही देखरेख आहे. एकाच हातात मुख्य प्रवाहातील माध्यमे, समाजमाध्यमे दिसतात. त्यामुळे जिओ म्हणणारे इतरांना जगू देणार की नाही असा प्रश्न पडतो, असे सांगत त्यांनी लोकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त केले.

या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांनी समाजमाध्यमांच्या विषयासंदर्भात बोलताना अध्यक्षीय भाषणामध्ये शब्दांचे अर्थ बदलत आहेत, असे सांगत आपण खरे काय, खोटे काय हे ओळखण्याची शक्ती गमावत आहोत, असे भाष्य केले. कोणत्याही नव्या गोष्टीची ताकद भांडवलवादी, फॅसिस्ट, मूलतत्त्ववादी ओळखतात. या तीन शक्तींची समाजमाध्यमांवर पकड आहे. सामान्यांना हे कळत नसून मनोरंजनाच्या चक्रात ते अडकले आहेत. त्यांची विचार करण्याची प्रक्रिया थोपवण्यात आली आहे. शैक्षणिक काम म्हणजे वंचित मुलांना शिकवणे एवढाच अर्थ नाही. त्या पलीकडे जायला हवे. तेच काम सध्या करत असल्याचे राजन इंदुलकर यांनी सांगितले.

धनगर समाज डोंगरावर राहतो. या समाजातील विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचत नाहीत. कातकरी-आदिवासी समाजाला अपेक्षित शाळा नाहीत. आपल्या चौकटबद्ध, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये ते रमत नाहीत. प्रयोगभूमी निवासी शाळेमध्ये सोयी नव्हत्या. त्या आता आहेत. ही शाळा मित्रांच्या मदतीवर सुरू आहे. त्यासाठी मदत करण्यास समाजाने पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Web Title: Identify the threat of the media - Paranjay Guha Thakurta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई