स्वत:मधले कौशल्य ओळखा
By admin | Published: March 9, 2017 03:53 AM2017-03-09T03:53:09+5:302017-03-09T03:53:09+5:30
तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले नसेल, तर तो एक गुन्हा आहे. स्वत:मधले कौशल्य शोधून त्यामध्ये गुणवत्ता प्राप्त करा, करिअर घडवा. तुमच्या करिअरसाठी राज्य
मुंबई : तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले नसेल, तर तो एक गुन्हा आहे. स्वत:मधले कौशल्य शोधून त्यामध्ये गुणवत्ता प्राप्त करा, करिअर घडवा. तुमच्या करिअरसाठी राज्य सरकार तुमचे समुपदेशन करेल, तुमच्यासाठी चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध करून देईल. कुआ खुद चलकर तुम्हारे पास आया है, तुम्ही त्याला प्रतिसाद द्या, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी तरुणींना केले.
चर्चगेट येथील एसएनडीटी विद्यापीठात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘स्व दिशा’ या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस, अभिनेत्री मधुरा वेलणकर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे प्रधान सचिव दीपक कपूर, पहिल्या भारतीय महिला फिटनेस ट्रेनर आणि फिटनेस आयकॉन लीना मोगरे आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या राज्य समन्वयक आफरीन सिद्दिकी यांनी हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान फडणवीस यांनी विद्यापीठातील विद्यार्थिनींसाठी बनविलेल्या ‘स्व:धार’ या अॅपचे अनावरण केले.
फडणवीस यांनी सांगितले, एकविसाव्या शतकातसुद्धा मुलींना शिकू दिले जात नाही, त्यामुळे उत्तम करिअर घडवता येत नाही. शिकण्यासाठी व करिअर घडविण्यासाठी त्यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासन आणि एसएनडीटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या कौशल्य विकासासाठी मिशन हाती घेतले आहे. त्यास आतापर्यंत १५ हजार मुलींनी प्रतिसाद दिला आहे.
‘स्व:धार’ अॅपद्वारे सर्वांना विद्यापीठाची, विद्यापीठामध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती मिळेल. महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांची आणि महिलांंसाठी असलेल्या संविधानिक तरतुदींविषयी माहिती मिळवता
येईल.
दक्षिण कोरियासारख्या छोट्या देशामध्ये ९८ टक्के लोकांचा कौशल्य विकास झाला आहे. अमेरिकेमध्ये हे प्रमाण ७६ टक्के तर जर्मनीमध्ये हे प्रमाण ६८ टक्के असल्यामुळे हे देश विकसित आहेत. याउलट हेच प्रमाण सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये मात्र, २ टक्के एवढे कमी आहे, अशी खंत दीपक कपूर यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, हे चित्र बदलण्यासाठी आणि तुम्हाला आकाशात उंच भरारी घेता यावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, असे आवाहन कपूर यांनी विद्यार्थिनींना केले.
आपण महिला दिन फक्त एकच दिवस का साजरा करायचा? वर्षाचे ३६५ दिवस हे आपलेच असतात, मुलींनो, ते तुम्ही मुक्तपणे जगा. लग्न झाल्यानंतर मुलगाच व्हावा, अशी अपेक्षा बाळगू नका, असे अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कौशल्य केंद्र उभारणार
महाराष्ट्र शासनाने युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या साहाय्याने ‘स्व दिशा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींसाठी समुपदेशन केंद्र व कौशल्य केंद्र उभारण्याचा शासनाचा मानस आहे, अशी माहिती युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या राज्य समन्वयक आफरीन सिद्दिकी यांनी दिली.
या उपक्रमामध्ये विविध विद्यापीठांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. हा उपक्रम विद्यार्थिनींना त्यांच्यामधील कौशल्य जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.