अलिबाग : मराठी भाषेइतकी ताकद व गोडवा दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाही. जिल्ह्यात होणाऱ्या ग्रंथोत्सवामुळे समाजाचे वैचारिक बदल घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले.अलिबाग सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणात उभारलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त भालचंद्र नेमाडे साहित्य नगरीमध्ये जिल्हा ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. अलिबाग शहराला साहित्याचा जुना वारसा लाभलेला आहे. जिल्ह्याने मोठे साहित्यिक दिल्याची आठवणही आमदार पाटील यांनी करून दिली. रणजित देसाई यांनी लिहिलेले शिवचरित्र महान असून त्यांच्या लेखणीत मराठी भाषेचा गोडवा असल्याचे पाटील यांनी सांगितले. मराठीशी असलेली नाळ मला तोडायची नव्हती म्हणून मी मायदेशात परतलो, असे ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम श्री म्हणजेच अभिनेता शशांक केतकर याने सांगितले. पुस्तक आणि ग्रंथ वाचण्यात जो आनंद आहे तो संगणकावरील पुस्तके वाचण्यात नाही. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जपली जाईल, असे विचार माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी मांडले. गं्रथोत्सवाच्या कार्यक्रमातून मराठी भाषेचा गौरव होत आहे. पुस्तके माणसांना शहाणे करतात. त्यामुळे लाखो रुपयांचे बंगले बांधणाऱ्यांच्या घरात पुस्तके नसणे म्हणजे ती घरे वांझोटी आहेत, असे परखड मत कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे यांनी मांडले. जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर रमेश धनावडे यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, उपसंचालक र.दे.वसावे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.
ग्रंथोत्सवाने वैचारिक बदल
By admin | Published: February 26, 2015 10:45 PM