शाळेत मिळेल इडली, पराठा अन् भगरही; खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना आता चवदार जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:30 AM2023-08-08T06:30:47+5:302023-08-08T06:31:01+5:30
माध्यान्ह भोजन हे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळेत मिळणाऱ्या माध्यान्ह भोजनात फक्त खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आता खिचडीसोबतच इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचे सत्व आणि पराठाही मिळणार आहे तशी शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केली असून शालेय शिक्षणमंत्री
दीपक केसरकर यांनी त्याचे स्वागत केले आहे.
माध्यान्ह भोजन हे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाते.
केंद्राने केली हाेती सूचना
केंद्र सरकारने स्थानिक उपलब्ध होणारे अन्नपदार्थ व तृणधान्य यांचा समावेश या आहारात करावा, असे सुचविले होते. या पार्श्वभूमीवर, आरोग्य, आहार आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती शालेय शिक्षण विभागाने नेमली होती.
समितीच्या शिफारशी
n सोयाबीन तेलाऐवजी सूर्यफुल तेलाचा वापर करावा. आठवडाभर एकच खाद्यवस्तू देण्याऐवजी दर दोन दिवसांनी आहार बदलावा.
n उडीद-तांदळाची इडली, रवा इडली, केशरी रवा इडली असे विविध प्रकार असावेत.
n मल्टिग्रेन पराठ्यामध्ये चार प्रकारचे धान्य असावे सोबत पुदिना चटणी द्यावी.
n याशिवाय माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या मानधनात वाढ करावी, असेही समितीने सुचविले आहे.
विष्णू मनोहर देणार पाककृतीचे प्रात्यक्षिक
n खाद्यपदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडीओ समितीचे एक सदस्य व सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर स्वत: तयार करणार आहेत.
n ते सर्व शाळांकडे पाठवून त्यानुसार खाद्यान्य तयार केले जातील.
विद्यार्थ्यांना विविध पोषक तत्त्वे मिळावीत व भोजनात वैविध्य असावे यासाठी आमच्या विभागाने या क्षेत्रांतील मान्यवरांची समिती नेमलेली होती. समितीने अहवाल दिलेला आहे. त्यानुसार अपेक्षित असलेले बदल नक्कीच केले जातील.
- दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री