सीमा महांगडे
मुंबई: कोरोना काळात सध्या गणेशोत्सवाच्या भव्य आयोजनावर आपल्याकडे काही बंधंने आली असली तरी बाप्पाच्या भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. बाप्पाचे भक्त कु़ठेही असले तरी ते गणेशोत्सव साजरा करतातच. असाच अनुभत सध्या दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर येत आहे. तेथील भारतीय जहाजावर चक्क बाप्पाचं आगमन झाले आहे आणि पूर्ण दहा दिवस सुखकर्ता दु:खहर्ता आणि अशा अनेक आरत्यांचा गजर चालू आहे.
कोरोनाचे संकट जगावर आले आणि जग जागेवरच थांबले. मात्र, या काळात आयात-निर्यातीचा समुद्री मार्ग चालू राहिला. जहाजांवर काम करणाऱ्या अनेका अधिक काळ याच मार्गावर फिरतीवर थांबावे लागले आणि अनेक सणांना ही मुकावे लागले. मात्र काही जहाजांवर या गणेशोत्सवाच्या काळातही आनंद टिकून राहिला आहे कारण तेथील कर्मचारी जहाजावरच्याच आपल्या कुटुंबासोबत गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सागरी प्रदूषणाचे नियम पाळून साऊथ आफ्रिकेत भारतीय जहाजावर २५ नाविकांकडून गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना प्रत्येक नाविकाकडून आपल्या जबाबदारी आणि कामामध्ये कोणताही कसूर होत नाहीये हे विशेष... !
हेराल्ड मेरीटाईम सर्व्हिसेसचे ओसीअन डिग्निटी नावाचे जहाज सध्या साऊथ आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यालगत आहे. कोरोना संकटामुळे अनेक कंपंन्यांमधील नाविकांना जहाजावरच राहावे लागले आहे. काहींना ४ ऐवजी ८ - ८ महिने काढावे लागले आहेत. अशा परिस्थितीत सर्व नाविकांचा जल्लोष , उत्साह टिकून रहावा याकरिता जहाजाचे कॅप्टन भूषण अभ्यंकर यांनी जहाजावरच गणेशाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. सागरी जहाजांच्या एमएलसी एक्टनुसार जहाजावरील कॅप्टनला तेथील नाविकांसाठी मनोरंजनात्मक , उत्साहवर्धक कार्यक्रम, उपक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी असते. कोविड १९ च्या काळात सगळेच नाविक घरच्या ओढीने, काळजीने हिरमुसलेलें असताना त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी कंपनीच्या प्रमुखांची परवानगी घेऊन अभ्यंकर यांनी गणेशोत्सव जहाजावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. स्वतः त्यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. जहाजावरील जो क्रू कामात असतो, तो सोडून इतर सर्व वेळात वेळ काढून आरतीला उपस्थित राहतात . सागरी प्रदूषणाच्या नियमांप्रमाणे जहाजावरील कचरा जहाजांना डिक्लेअर करावा लागतो आणि त्याचे वर्गीकरण अन्नकचरा आणि धातू , पेपरयांचा कचरा असे साधारणपणे केले जाते. ओसीअन डिग्निटीवरील क्रू सदस्यांनी या सगळ्यांची पुरेपूर काळजी घेऊन हा गणेशोत्सव साजरा करत आहे.साधारणतः अरेबिअन देशाच्या सागरी सीमेत प्रवेश केल्यानंतर मूर्तिपूजा, देवांचे फोटो अशा वस्तुंना बंदी असते मात्र सध्या जहाज आफ्रिकन सागरे सीमेत असल्याने ही काळजी नसल्याचे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाशी जहाजावरील अनेकांच्या भावना थेट जुळल्या आहेत. अनेक संकटे आली तरी कोरोना योद्धयांप्रमाणे नाविक ही सागरी सीमांत आपली आयात निर्यातीची जबाबदारी न थांबता पार पडत असतात. त्यामुळे हे जागांवरील संकट लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना ही त्यांनी या निमित्ताने बाप्पाकडे केली आहे.
जहाजावरच घडवली बाप्पाची मूर्ती
जहाजावरील सर्व नाविकांनी याला उत्साहाने पाठिंबा देऊन पर्यावरणपूरक अशी मैदा आणि पिठापासून गणेशाची मूर्ती बनवली आणि खाण्याच्या रंगापासून ती आकर्षक अशा रंगामध्ये सजविली. मारपोल (मरिन पोल्युशन) च्या नियमांनुसार सागरी हद्दीत कोणत्याही प्रकारचा कचरा टाकणे जहाजांना किंवा त्यावरील नाविकांना प्रतिबंधित असते. या कारणाने हा पर्यावरण पूरक गणपतीची जहाजावर प्रतिष्ठापना करण्यात आली. जहाजावरील जो कर्मचारी कामात असतो, तो सोडून इतर सर्व वेळात वेळ काढून आरतीला उपस्थित राहतात.
कोविड परिस्थितीत आयात निर्यात थांबली नसली तरी नाविकांच्या आज्ञा उतरण्याची खूप गैरसोय होत असून, मार्ग अवघड झाले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबापासून दूर असलेल्या नाविकांना उत्साहवर्धक वातावरण आणि मानसिक दिलासा यामधून मिळणार आहे.राजेंद्र बर्वे, कार्यकारी अध्यक्ष, एचएमएस मारिन सर्व्हिसेस लिमिटेड
पुजेसाठी वापरले जहाजावरीलच साहित्य
सजावटीसाठी जहाजावरील त=स्टीव्हर्ट, एबी, फिटर, चीफ इंजिनिअरपासून सगळ्यांनीच हातभार लावला. कागदी फुलांची सजावट, जुन्या धातूंचे बनविलेले तबक, जुन्या चार्ट नकाशांच्या अपरापासून बनविलेली जास्वदींची फुले आणि विड्याची पाने या साऱ्यामधून या निमित्ताने कामाव्यतिरिक्त जहाजावरील प्रत्येकाची कल्पक दृष्टी दिसून आल्याची माहिती कॅप्टन भूषण अभ्यंकर यांनी दिली.