मुंबई: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दूरस्थ शिक्षण २०२० च्या नियमावलीनुसार मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच आयडॉलच्या नावात बदल करून ते नाव "दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र " असे करण्यात आले आहे . मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये आयडॉलचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. दूरस्थ शिक्षणासोबतच भविष्यात अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम याद्वारे सुरू करण्यात येतील. युजीसीचे निर्देशभारतातील सर्व मुक्त विद्यापीठे व दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२० मध्ये नियमावली जाहीर करण्यात आली. या नियमावलीमध्ये भारतातील दूरस्थ शिक्षण संस्थेच्या संस्थांना अनेक नवीन नियम करण्यात आले. त्यामध्ये भारतातील सर्व दूरस्थ शिक्षण संस्थेचे नाव देखील सारखे असावे यासाठी दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्थांना "सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन" (सीडीओई) असे नामकरण करणे अनिवार्य केले.
नवीन ऑनलाईन अभ्यासक्रमदूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत दूरस्थ शिक्षणासोबत अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्याची योजना आहे. प्रारंभी पाली भाषा व इंग्रजी भाषेतील काही प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम व एमए समाजशास्त्र हे अभ्यासक्रम ऑनलाईनद्वारे सुरु करण्यात येतील. यानंतर इतर अभ्यासक्रमही ऑनलाईन करण्याचा मानस या केंद्राचा आहे असे या सीडीओईचे प्रभारी संचालक डॉ. संतोष राठोड यांनी सांगितले.
उपलब्ध अभ्यासक्रममुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रात सध्या २४ अभ्यासक्रम आहेत. पदवीस्तरावर एकूण ५ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बीए, बी.कॉम, बी.कॉम अकाऊंटिंग व फायनान्स, बीएससी माहिती व तंत्रज्ञान व बीएससी संगणकशास्त्र हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तर पदव्युत्तर स्तरावर एकूण १९ अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून उपलब्ध आहेत. एमएमध्ये इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल यासह मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषाविषयक विषय आहेत. तसेच एमए शिक्षणशास्त्र, एमए मानसशास्त्र, एमए संज्ञापन व पत्रकारिता व एमए जनसंपर्क हे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेमधील एम.कॉम तर विज्ञान शाखेमध्ये एमएससी गणित,आयटी व कॉम्प्युटर सायन्स असे तीन विषय असून मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लीकेशन- एमसीए हा अभ्यासक्रमदेखील विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. सध्या व्यवस्थापन शास्त्राचे महत्व ओळखून एमबीएच्या समकक्ष असा दोन वर्षाचा एमएमएस व एक वर्षाचा डिप्लोमा इन फायनान्शियल मॅनेजमेंट हि पदविका उपलब्ध आहे.
मुंबई विद्यापीठ आता कॅटेगरी १ विद्यापीठ झाल्याने व आयडॉलच्या नावात सीडीओई असा बदल झाल्याने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राची कक्षा जगभर रुंदावली आहे. व या सीडीओई केंद्रामार्फत दूरस्थ शिक्षणासोबत अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. व ते जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. - प्रा. डॉ. रविंद्र कुलकर्णी, कुलगुरू मुंबई विद्यापीठ
अनेक मान्यवरांचा प्रवेश
दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रात सर्वसामान्य विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीही प्रवेश घेतात. यामध्ये राजकीय मान्यवर देवळाली नाशिकच्या आमदार सरोज अहिरे, माजी आमदार विवेक पंडित, वसई -विरार महानगरपालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी, असामी अभिनेत्री अरुन्धती बोरा, चित्रपट व टीव्ही क्षेत्रातील आदेश बांदेकर, मधुरा वेलणकर, महादेव मालिकेतील ऋषिराज पवार, अस्मिता मालिकेतील योगेश सोहनी, बुद्धिबळामधील छत्रपती पुरस्कार विजेती प्रणाली धारिया, नॅशनल शूटर व छत्रपती पुरस्कार विजेती रुचिरा लावंड व माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली अशा अनेक मान्यवर व्यक्तीनी दूरस्थ आणि ऑनलाईन केंद्रातुन शिक्षण पूर्ण केले आहे व करीत आहेत.