- चेतन ननावरे मुंबई : कामाठीपुरातील पाचव्या गल्लीत विराजमान झालेला बाल गोपाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ‘दक्षिण मुंबईचा सम्राट’ सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. कारण हीरक महोत्सवी वर्षी २० फुटांच्या पीओपीच्या मूर्तीला बगल देत मंडळाने अवघ्या अडीच फुटांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.मंडळाचे अध्यक्ष रमेश रापेल्ली म्हणाले की, पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहन प्रत्येक मंडळ करीत असते. मात्र त्याची अंमलबजावणी स्वत:पासून करण्याचा विचार मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी मांडला. त्याला समर्थन देत मंडळाच्या कार्यकारिणीने या वर्षी हीरक महोत्सवाचे निमित्त साधत हा निर्णय घेतला. त्याला साथ देत मंडळातील एका भक्ताने पंचधातूची मूर्ती देण्याची घोषणा केली. त्यामुळे मंडळाला दरवर्षी पीओपीच्या मूर्तीसाठी कराव्या लागणाऱ्या एक लाख रुपयांहून अधिकच्या खर्चाची बचत होणार आहे. याशिवाय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेत पर्यावरणपूरक देखावाही उभारला. प्रभादेवी येथील सिद्धिविनायकासारख्या हुबेहूब दिसणाºया या दक्षिण मुंबईच्या सम्राटाची सोंडेची दिशा मात्र बदलण्यात आली आहे. मूर्तीच्या पैशांमधून मंडळामार्फत सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे रापेल्ली यांनी सांगितले.दरम्यान, गिरगाव चौपाटीपर्यंत पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत विसर्जन मिरवणूक निघेल. त्यानंतर चौपाटीवर पंचामृताचा अभिषेक करून मूर्तीचे नाममात्र विसर्जन केले जाईल. त्यानंतर पुन्हा ही मूर्ती घेऊन याच ठिकाणी असलेल्या श्रीकृष्ण सेवा मंडळाच्या कार्यालयात विराजमान होईल. या ठिकाणी कायमस्वरूपी मंदिर बांधण्यात येणार आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला हीच मूर्ती मंडपात विराजमान केली जाईल. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, असे मंडळाचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर गंटोला यांनी सांगितले.वाचलेल्या पैशांतून वाचनालय उभारणारपीओपीच्या मूर्तीला तिलांजली देत पंचधातूची मूर्ती प्रतिष्ठापित केल्याने दरवर्षी मंडळाची लाखो रुपयांची बचत होणार आहे. या पैशांमधून मंडळ स्थानिकांसाठी वाचनालय उभारणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाºयांनी सांगितले. जागेची पाहणी सुरू असून लवकरच या उपक्रम पूर्ण करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.
पीओपीला तिलांजली देत पंचधातूची मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 5:00 AM