Join us

आयडॉल सुरू करणार दूरस्थ माध्यमातून एमएमएस अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था ( आयडॉल ) दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था ( आयडॉल ) दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच एमएमएस हा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा अभ्यासक्रम लवकरच सुरू करणार आहे. हा अभ्यासक्रम आयडॉलमधून सुरू करण्यास विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने मान्यता दिली आहे. आता युजीसी-डीईबीने मान्यता दिल्यानंतर हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरू होणारा व्यवस्थापन शाखेचा एमएमएस हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असून, तो चार सेमिस्टरमध्ये विभागला गेला आहे. आयडॉल व नियमित महाविद्यालयाचा एमएमएसचा अभ्यासक्रम सारखाच आहे. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोकडे पुढील मान्यतेसाठी पाठविला जाईल. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर हा एमएमएस अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरू करण्याचा मानस आहे, असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.

या एमएमएस अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य तयार करण्यात येईल, तसेच एमएमएसचे दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असायनमेंट, प्रोजेक्ट असणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासकेंद्रामधून प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे, तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शनही केले जाणार आहे. यासाठी आयडॉलमध्ये एमएमएस अभ्यासक्रमासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. या एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयडॉल स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेणार आहे.

............

भारतात अनेक विद्यापीठे दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून व्यवस्थापनाचा एमबीए अभ्यासक्रम चालवितात. मुंबई विद्यापीठातूनही दूरस्थ माध्यमातून हा अभ्यासक्रम सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे एमएमएस शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. हा अभ्यासक्रम दर्जेदार पद्धतीने चालविण्यात येईल.

- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ.