मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने आयडॉलची मान्यता रद्द केली नाही, तर विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्टीकरण देण्याची नामुष्की पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण (आयडॉल) संस्थेवर ओढावली. या आधीही हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आयडॉल विभागाला खुलासा करावा लागला होता. यावेळी यासंदर्भात आयडॉलने विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे.यूजीसीने ६ सप्टेंबर, २०१८ मध्ये दुरस्थ शिक्षण विभागासाठीच्या नियमावलीत तिसरी सुधारणा केली. या अंतर्गत विद्यापीठांच्या गुणवत्तेचा दर्जा जाहीर करण्यासाठी आवश्यक नॅक मूल्यांकनासाठी विद्यापीठांना शिथिलता दिली. त्यानुसार, हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत विद्यापीठांना नॅक मूल्यांकनासाठी मुदत मिळाली. यानुसार, ५ आॅक्टोबर, २०१८ रोजी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागाने नॅक मूल्यांकनासाठी प्रस्ताव सादर केला. त्याची छाननी सुरू आहे. त्यामुळे मान्यता रद्द झाली नसून, प्रक्रिया सुरू असल्याचे आयडॉलच्या प्रभारी संचालिका यांनी सांगितले. तर, विद्यार्थ्यांनी आयडॉलच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता निश्चिंत राहावे, यासाठी स्पष्टीकरण दिल्याचे आयडॉलचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांनी सांगितले.
आयडॉलची मान्यता रद्द नाही, प्रक्रिया सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 5:59 AM