आयडॉलचे आॅनलाइन हॉल तिकीट मिळत नसल्याने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 02:12 AM2018-04-22T02:12:58+5:302018-04-22T02:12:58+5:30
विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई : परीक्षेच्या तयारीत हॉलतिकिटासाठी विद्यार्थ्यांना धावाधाव करायला लागू नये म्हणून मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट आॅनलाइन उपलब्ध करून दिले. मात्र, परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांच्या लॉगइन आयडीवर अजून विद्यापीठाने हॉलतिकीट उपलब्ध करून दिले नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या प्रथम वर्ष बीकॉम आणि बीएच्या परीक्षा एप्रिल/ मेमध्ये होणार आहेत. त्यासाठीचे हॉलतिकीट आॅनलाइन उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी ते स्वत:च्या लॉगइन आयडीवरून घेण्याच्या सूचना आयडॉल संचालकांकडून करण्यात आल्या होत्या. मात्र शनिवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांना वेबसाइटवर उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. सोबतच अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारीही विद्यार्थ्यांनी युवासेना आणि स्टुडन्ट लॉ कौन्सिलकडे केल्याची माहिती स्टुडन्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.
२३ एप्रिलपासून आयडॉलच्या परीक्षा सुरू होत आहेत. आॅनलाइन हॉलतिकीटसाठी संकेतस्थळावरही अडचणी येत आहेत. त्यामुळे रविवारीही आयडॉलचे कार्यालय सुरू ठेवण्याची मागणी मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मलाळे यांची भेट घेऊन स्टुडंट लॉ कौन्सिल, युवासेनेच्या सदस्यांनी केली.
विद्यार्थ्यांना http://idoloa.digitalunivesity.ac/ या संकेतस्थळावर हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरीदेखील काही तांत्रिक अडचणी आल्यास विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल कार्यालयात येऊन सांगू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आयडॉलचे कार्यालय आजही उपलब्ध असणार आहे.
- डॉ. डी. हरिचंदन, संचालक, आयडॉल