Join us

आयडॉलच्या हंगामी प्राध्यापकांना वेतनही नाही आणि मुदतवाढ ही... !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 6:23 PM

लॉकडाऊन काळात विद्यापीठाकडून आर्थिक कोंडी केल्याचा मनविसेचा दावा

 

मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत देशासह राज्यातील सर्वच शैक्षणिक संस्था सध्या बंद आहेत, मात्र  शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्ववभूमीवर संस्थांमधील शिक्षकांचे वेतन रोखले जाऊ नये आणि त्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशा सूचना केंद्राच्या मनुष्यबळ विकास विभागाकडून दिल्या असतानाही मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागाचा असाच प्रकार नुकताच समोर आला आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात हंगामी प्राध्यापकांना त्यांचे वेतन देण्यास आयडॉलच्या प्रभारी संचालकांकडून टाळाटाळ होत आहे.  विद्यापीठाच्या कुलगुरूंना या बाबतीत निवेदने देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आयडॉलच्या प्रभारी संचालकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.आयडॉल च्या संचालिका डॉ. कविता लघाटे यांना पाच हंगामी प्राध्यापकांच्या थकीत पगाराबाबत मनविसेच्या शिष्टमंडळाकडून यापूर्वीच अवगत करण्यात आले होते. त्यांना मार्चपर्यंत मुदतवाढ मिळूनही संबंधित ५ पाच हंगामी प्राध्यापकांची फेब्रुवारी व मार्च २०२० च्या पगाराची रक्कम अदा केली गेलीली नसल्याची माहिती मनविसेचे मुंबई अध्यक्ष संतोष धोत्रे यांनी दिली. किमान लॉकडाउनच्या काळात आमच्या सेवेमध्ये मुदतवाढ तरी देऊन आम्हाला त्याबाबत विद्यापीठाने अवगत करावेत अशी प्रतिक्रिया एका हंगामी प्राध्यापकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.त्यामुळे कोरोना सदृश्य परिस्थितीच्या काळात कामगारांचा पगार न देणे हा भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत गुन्हा आहे त्यामुळे आयडॉल च्या या पाच प्राध्यापकांचा पगार त्वरित व्याजासकट काढावा व पगाराच्या दिरंगाईमुळे व्याजाची रक्कम संचालिका डॉ. कविता लघाटे यांच्या पगारातून वसूल केली जावी अशी मागणी केली आहे. सोबतच या पाच हंगामी प्राध्यापकांच्या नियुक्ती पत्राप्रमाणे त्यांचा कार्यकाल ३१ मार्च २०२० ला संपुष्टात आला आहे. त्यामुळे शासनाच्या शासन निर्णयानुसार टाळेबंदीच्या काळात त्यांना सेवेची मुदतवाढ देण्याचे आदेश त्वरित काढले जावेत अश्या मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांना ई मेल केले आहे. यावर पुढील ७ दिवसांत अमलबजावणी न झाल्यास मुख्यमंत्री  व राज्यपालांकडे जाऊन कोविड - १९ च्या काळात वरील बाबतीत हलगर्जीपणा करीत असल्याचे पुरावे देऊन त्यांच्याशी आपल्या विरोधात दाद मागावी लागेल व याची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल याची नोंद घ्यावी असा इशारा ही कुलगुरूना दिला आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर आणि रजिस्टार अजय देशमुख याना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस