Join us

सासू हवी तर अशी, कांदिवलीत सुनेला दिली किडनी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 7:05 AM

सासूने सुनेला किडनी दान दिल्याची घटना दुर्मिळ असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सासू-सुनेतील वाद हा अनेकदा चर्चेचा विषय. प्रत्येकवेळी सासू-सुनेत वाद असतोच असे नाही. अनेकदा या नात्यात गोडवाही असतो. अगदी आई-मुलीसारखेही त्यांचे नाते असते. असेच उदाहरण समोर आले. कांदिवली येथे सासूने सुनेची किडनी निकामी झाल्याचे समजताच आजारातून मुक्तता मिळावी म्हणून स्वतःची किडनी दान करून जीवनदान दिले. सासूने सुनेला किडनी दान दिल्याची घटना दुर्मिळ असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. 

अमिशा मोता (४३) यांना किडनी विकाराचा, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यावर त्या उपचार घेत होत्या. मात्र, तीन महिन्यांपूर्वी किडनी बदलावी लागेल, अन्यथा डायलेसिसवर जावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. अमिशा यांच्या घरातील सदस्यांनी किडनी देण्यासाठी चाचपणी सुरु केली. अमिशा यांच्या पतीला वैद्यकीय कारणामुळे किडनी देणे शक्य नव्हते. अमिशा यांच्या आई-वडिलांना सुद्धा ते शक्य नव्हते. 

अखेर सासूबाई प्रभा मोता स्वतःहून पुढे आल्या. त्यांचे वय ७० वर्षे. त्यांना आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी नव्हत्या. तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय झाला. १ ऑगस्ट रोजी सासू-सुनेवर विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सासूबाईंची तब्बेत उत्तम असल्यामुळे त्यांना पाच दिवसांनी घरी सोडण्यात आले. तर सून अमिशा यांना दोन दिवसांनी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 

आई-मुलीचे नाते प्रभा मोता यांनी सांगितले की, ‘मला तीन मुले आहेत. मला मुलगी नाही. या तीन सुना म्हणजे माझा मुली आहेत.  त्या जर अडचणीत असतील तर त्यांची आईच त्यांच्या मदतीसाठी पुढे जाईल.  माझ्या सुनेला किडनी विकारातून मुक्त करण्यासाठी मी स्वतःहून किडनी देण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीचा मला आनंद आहे.’ 

गेल्या २० वर्षांच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये सासूने सुनेला किडनी देणे ही दुर्मिळ घटना आहे. कारण आपण आई मुलाला, बायको नवऱ्याला, बहीण भावाला अशी उदाहरणे नेहमी पाहत असतो. मात्र, अशा पद्धतीने सासूने सुनेला किडनी देण्याच्या घटना दुर्मिळ आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात सासूची तब्बेत अतिशय ठणठणीत होती. ऑपेरेशननंतर त्यांची रिकव्हरी अपेक्षेपेक्षा वेगात झाली आहे.  - डॉ. जतीन कोठारी, किडनीविकारतज्ज्ञ

टॅग्स :अवयव दान