मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेने स्वतंत्र लढल्यास दोन्ही पक्षांना मिळून केवळ 20 जागा जिंकता येतील, असा अंदाज एबीपी न्यूज आणि सी व्होटर सर्वेचा आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यास त्यांना 28 जागा मिळतील असे या सर्वेक्षणातून दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे कमबॅक होण्याची शक्यता आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 6 जागा जिंकलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला यंदा तब्बल 28 जागा मिळतील, असा निष्कर्ष आहे. तर सध्याच्या भाजपा-शिवसेनेतील वादामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजपाला 16 तर शिवसेनेला केवळ 4 जागा मिळतील, असे एबीपी आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे स्वतंत्र लढल्यास भाजपा आणि शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, लोकसभा 2014 मध्ये भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली असून एनडीए आघाडीला 42 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यंदा या दोन्ही पक्षातील धुसफूस पाहता स्वबळावर निवडणुका झाल्यास दोन्ही पक्षांना मोठा पराभव स्विकारावा लागेल.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, आघाडीच्या जिंकण्यात येणाऱ्या 28 जागांपैकी काँग्रेसला 19 आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळतील, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. एकूणच सर्वेक्षणाचे चित्र पाहता भाजपची मोठी पिछेहाट होण्याची शक्यता असून काँग्रेस राष्ट्रवादीला उभारी मिळू शकते.