मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर जिंकले काय आणि हरले काय, यात माझा काय दोष? मतदार जे ठरवतात, ते होईल. पण अमोल जिंकला तर मला वडील म्हणून नक्कीच आनंद होईल, असे महाविकास आघाडीला आणखी एक पोषक विधान करत खासदार गजानन कीर्तिकर यांनी खळबळ उडवून दिली.
गजानन कीर्तिकर यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण होत असून, त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करणारे पत्र शिंदेसेनेचे नेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. यावर गजानन कीर्तिकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात पत्रकारांनी प्रश्न केला २० दिवस तुमचा पाठिंबा कोणाला? रवींद्र वायकर यांच्या पूर्वतयारीसाठी जेवढ्या सभा झाल्या त्या सर्वांना मी उपस्थित होतो. कोल्हापूर आणि नाशिकमध्ये जाऊन प्रचारही केला. तरीही काही गोष्टींचा विपर्यास करण्यात आला. याचा मला त्रास होतो. असा प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये. माझ्या पत्नीने सांगितली ती गोष्ट खरी आहे, तिने तिचे मत मांडले, असेही गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे भविष्य घडवणारा नेता- मी खासदार असताना आम्ही कामाची विभागणी केली होती. मला सर्व बघायला वेळ मिळत नव्हता. अमोल नऊ वर्षे सर्व पाहत होता. मी ५७ वर्षे शिवसेनेत आहे. - माझ्या कुटुंबीयांची भावना होती की, तुम्ही शिवसेना सोडून जाऊ नका. पण एकनाथ शिंदे हा भवितव्य घडवणारा नेता आहे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. आमचा पक्ष कुठेतरी भरकटत होता म्हणून मी शिंदे यांच्याकडे गेलो. - एकनाथ शिंदे यांना मी शेवटपर्यंत साथ देईन. मी आता एकनाथ शिंदेंना जाऊन भेटणार आहे, असेही ते म्हणाले.