मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भाजपा आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. शुक्रवारी सकाळी आमदार राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाराष्ट्र सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. त्यानंतर, आज पुन्हा एकदा अर्णब गोस्वामींच्या सुटकेसाठी राम कदम यांनी सिद्धीविनायकाला साकडे घातले आहे. तसेच, अर्णब गोस्वामींच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करू, असेही कदम यांनी म्हटले.
राम कदम यांनी घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा केली, त्यावेळी अर्णब यांच्या सुटकेसाठी श्री सिद्धीविनायकाला साकडेही घालण्यात आले. अर्णब यांना करण्यात आलेली अटक चुकीची आहे. त्याचा आम्ही विरोध करत आहोत. या अटकेचा सर्वचस्तरातून विरोध होत आहे, असं सांगतनाच ज्या दिवशी अर्णव यांची सुटका होईल, त्याच दिवशी आम्ही दिवाळी साजरी करू, असं कदम यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारला अर्णव यांना या प्रकरणात अडकवायचे आहे. त्यामुळेच त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली. अर्णब यांच्या केसाला जरी धक्का लागला तर, देशातील जनता हे कदापी सहन करणार नाही. येत्या काळात ठाकरे सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही कदम यांनी दिला.
पोलिसांचं निलंबन करावं
ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली त्यांना निलंबित करावं आणि चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेतली, पोलिसांचा आदर करतो, पण कायद्यानुसार अशाप्रकारे अर्णब गोस्वामींसारख्या पत्रकाराला मारहाण करणं योग्य नाही, त्यामुळे या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी केली, मात्र हे सरकार धुतराष्ट्राचं सरकार आहे, आंधळे आणि बहिरे सरकार असल्याने त्याची किंमत मोजावी लागेल. या सरकारला वठणीवर आणण्याचं काम जनता करेल अशी टीका राम कदम यांनी केली.
रायगड पोलिसांनी केली अटक
प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, या अटकेवेळी नियमांचे उल्लंघन करून पोलिसांनी अर्णब गोस्वामींना मारहाण केली. आम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान, आदर करतो परंतु ज्या ९ पोलिसांनी अशाप्रकारे पत्रकाराला मारहाण केली, ते देशातील समाज सहन करणार नाही. या ९ पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लोकशाहीत पत्रकारिता चौथा स्तंभ आहे, पत्रकारितेवर हल्ला करणारे आणि महाराष्ट्राला आणीबाणीच्या दिशेने नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे आणि तात्काळ अर्णब गोस्वामींची सुटका करायला हवी. गणवेशाचा वापर करून अर्णब गोस्वामींना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आम्हाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जावं लागेल असं म्हटलं होतं.