आता बिल भरले नाही तर वीजपुरवठा होणार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:07 AM2021-01-20T04:07:36+5:302021-01-20T04:07:36+5:30
महावितरणचा इशारा : ६३ हजार ७४० कोटींची थकबाकी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डिसेंबरअखेर राज्यात ६३ हजार ७४० कोटी ...
महावितरणचा इशारा : ६३ हजार ७४० कोटींची थकबाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डिसेंबरअखेर राज्यात ६३ हजार ७४० कोटी थकबाकी असून, आता जर ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे महावितरणने म्हटले आहे. परिणामी वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिले.
कोरोनामुळे काळात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबरअखेरपर्यंत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या. डिसेंबरअखेर कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी थकबाकी आहे. वाणिज्यिक, घरगुती, औद्याेगिक ग्राहकांकडे ८ हजार ४८५ कोटी व उच्चदाब ग्राहकांकडे २ हजार ४३५ कोटी थकबाकी आहे. थकबाकीचा डोंगर वाढल्याने थकबाकी वसुलीसाठी जानेवारीपासून मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले आहेत. ग्राहकांना वीजबिल हप्त्यामध्ये भरण्याची सवलत आहे. थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय घेतला आहे.
..................................