LMOTY 2018: ...तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते; मुख्यमंत्री फडणवीसांचा सेनेवर बाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:07 AM2018-04-11T11:07:59+5:302018-04-11T11:07:59+5:30
सेनेला १४७ पैकी १२० जागा जिंकता आल्या असत्या व उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते.
मुंबई: शिवसेना आणि भाजपाने 2014 साली युती केली असती तर कदाचित उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते मंगळवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार’ सोहळ्यातील मुलाखतीमध्ये बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. त्यांनी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर ‘रोखठोक’ प्रश्नांची सरबत्ती केली, तर मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांचा समर्पक ‘सामना’ केला.
यावेळी सन २०१४ मध्ये शिवसेनेनेमुळे युती तुटल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तेव्हा भाजपा शिवसेनेला १४७ जागा द्यायला तयार होती. आम्हाला १२७ जागा व मित्रपक्षांना इतर जागा, असे सूत्र ठरले होते. त्यामुळे सेनेला १४७ पैकी १२० जागा जिंकता आल्या असत्या व उद्धवजी मुख्यमंत्री झाले असते. ते तयार झाले नसते तर आपणही मुख्यमंत्री होऊ शकला असतात, अशी मिष्किल टिप्पणीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
मात्र, आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांची युती होईलच, असा ठाम विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मानणाऱ्या पक्षाला २0१९ मध्ये भाजपासोबत युती करण्याखेरीज पर्याय नाही. ज्या वेळी देशातील तथाकथित सेक्युलर एकत्र येतात, त्या वेळी देशातील सर्वधर्मसमभाव मानणारे हिंदुत्ववादी यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली असती. त्यामुळे त्यांच्या विचारांनी चालणाऱ्या पक्षाला २0१९ मध्ये युती करणे अपरिहार्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.