अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास राज्यघटनेमध्ये निश्चितच बदल होईल, असा धोक्याचा इशारा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी दिला. हुकूमशाही राजवट आणू पाहणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महागाई, केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार, शेतकरी, मजूर, कष्टकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी शेकापने काढलेल्या महामोर्चात ते बोलत होते. शेतकरी भवनातून मोर्चाला सुरुवात झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. मात्र तो जनरल अरुणकुमार वैद्य शाळेजवळ रोखण्यात आला. तेथेच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवतानाच आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण काही तासांत देण्यात आल्याच्या दुटप्पीपणावर त्यांनी बोट ठेवले. पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पातील शेतकºयांना साडेबारा टक्के विकसित भूखंड, जमिनींना पाचपट दर देण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आ. धैर्यशील पाटील, आ. बाळाराम पाटील, आ. सुभाष पाटील यांच्यासह शेकापचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.रायगड जिल्ह्यातील एसईझेड प्रकल्पाचे पुनरुजीवन करू देणार नाही, असे सांगतानाच कोळी, मच्छीमार, शेतकºयांच्या प्रश्नांवरही त्यांनी भाष्य केले. हा समाज शांत असला तरी पुढचा मोर्चा हा कोयते आणि काठ्या घेऊन काढला जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यात्रांना पाठिंबाशेकापला कमी जागा दिल्या तरी चालतील; परंतु देशात सत्ता परिवर्तन झालेच पाहिजे, अशी भूमिका सर्वपक्षीय आघाडीच्या बैठकीत घेतल्याचे सांगून जयंत पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आमचे वैचारिक मतभेद आहेत; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात काढलेल्या परिवर्तन रॅलीला, काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.