मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने शिवसेनेसोबत युती केली तर मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडेन, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी दिला. 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी राणे यांना आगामी निवडणुकीत तुमचा क्रमांक एकचा शत्रू कोण असेल?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता शिवसेनेचे नाव घेतले. त्यावर पत्रकारांनी आगामी निवडणुकीत भाजपाने शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला तर काय कराल, अशी गुगली टाकली. तेव्हा राणे यांनी स्पष्ट केले की, असे झाल्यास मी भाजपाची साथ सोडेन. जेव्हा भाजपा राज्याच्या मंत्रिमंडळात मला स्थान देत होती तेव्हा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. ते एवढी आडमुठी भूमिका घेत असतील तर त्यांच्याशी युती केल्यास मलाही भाजपासोबत राहणे उचित वाटत नाही, असे राणे यांनी म्हटले. त्यामुळे आता नारायण राणे यांच्या या आक्रमक पवित्र्याबाबत भाजपा काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईत शुक्रवारी झालेल्या भाजपाच्या महामेळाव्यात भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा दर्शविली होती. मात्र, आता राणेंनी आपली शिवसेनाविरोधी भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांना डावलून भाजपा शिवसेनेशी युती करणार का, हे पाहणेही औत्स्युकाचे ठरेल.
शिवसेना-भाजपाची युती झाली तर मी NDA सोडेन; नारायण राणेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2018 3:56 PM