मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे बहुतांश कल आता हाती आले असून, या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतली आहे. दरम्यान, या कलांमध्ये एनडीएमधून जेडीयूपेक्षा भाजपाला अधिक जागा मिळण्याचे संकेत मिळत आहे. मात्र असे असले तरी बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील असे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही भाजपाने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास तो स्वीकारणार का, असे विचारले असता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तेवर आहे. मात्र आता बिहारप्रमाणे कमी जागा असलेल्या सहकाऱ्याला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपाने दिल्यास काय करणार असे विचारले असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राजकारणात काही बाबी असतात. मात्र आता आम्ही खूप पुढे आलो आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचे सत्तेतील सहकारी आहेत. आता आम्ही या सहकाऱ्यांना अर्ध्यांवर सोडणार नाही. टीव्ही नाईनमधील चर्चेत सहभागी असताना नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व २४३ जागांवरील कल समोर आले आहे. या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए १३२ जागांवर आघाडीवर आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महा आघाडीला ९८ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला ४ जागांवर आघाडी मिळाली आहे.गेल्या वर्षी महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या महायुतीला १६० च्या आसपास जागा मिळाल्या होत्या. मात्र निकालांनंतर भाजपाने शिवसेनेस मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून सरकार स्थापन केले होते.