बिल्डरकडून सुपारी तर घेतली नाही ना ?
By admin | Published: January 6, 2017 04:55 AM2017-01-06T04:55:33+5:302017-01-06T04:55:33+5:30
भाडेकरारावरील भूखंडांच्या नूतनीकरणाचे धोरण दप्तरी दाखल करून, मित्रपक्षाला धक्का देणाऱ्या शिवसेनेचा मुंबई भाजपाने गुरुवारी समाचार घेतला
मुंबई : भाडेकरारावरील भूखंडांच्या नूतनीकरणाचे धोरण दप्तरी दाखल करून, मित्रपक्षाला धक्का देणाऱ्या शिवसेनेचा मुंबई भाजपाने गुरुवारी समाचार घेतला. हे धोरण मंजूर झाल्यास, अशा भूखंडांवर असलेल्या चाळी व दुकानांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असता. मात्र, सुधार समितीमध्ये तोंड शिवून बसलेल्यांनी पालिका महासभेत शिमगा का केला? कोणत्या बिल्डरची तर सुपारी घेतली नाही ना? असा थेट हल्ला भाजपाने चढवला आहे.
सुधार समितीचे अध्यक्ष व भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या द्वैवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन झाले. या वेळी सुधार समितीमध्ये मंजूर भाडेकराराचे धोरण पालिका महासभेत दप्तरी दाखल कसे झाले, याबाबत विचारले असता, मुंबई भाजपाने शिवसेनेवर तोफ डागली. हे धोरण दप्तरी दाखल केल्यामुळे चार हजार भूखंडांचा विकास रखडला आहे. यामध्ये ८० टक्के मराठी वस्तींचा समावेश आहे. घरासाठी केलेले काही बांधकाम दंड भरून त्यांना सुरक्षित करता येणार होते, असा दावा भाजपाने केला. जास्तीत जास्त घरांची निर्मिती व्हावी, अशी भाजपाची इच्छा आहे. परिणामी, घरांचे दर कमी होतील. मात्र, बिल्डरने बांधलेल्या घरांचे दर यामुळे घटतील, म्हणून तर हा प्रस्ताव अडकवण्याची सुपारी बिल्डरकडून घेतली आहे का? असा संशय भाजपाने व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे. (प्रतिनिधी)