मुंबई-
मुंबईत 'मातोश्री' बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याचा उल्लेख शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी 'बंटी-बबली' असा केला आहे. आमदार रवी राणा आणि खासदार Navneet Rana नवनीत राणा केवळ फिल्मबाजीचा स्टंट करत असल्याचंही राऊत म्हणाले. "कोणला स्टंट करायचे असतील तर करु द्यात. या स्टंटनं काहीही फरक पडत नाही. शिवसैनिकांना अशा स्टंटचा अनुभव आहे. त्यांना मुंबईचं पाणी कसंय हे माहित नाही. आमचे शिवसैनिक तयार आहेत", असा रोखठोक इशारा संजय राऊत यांनी राणा दाम्प्त्याला दिला आहे.
राज्यात हनुमान चालीसावरून राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही भागात भोंग्यावरून हनुमान चालीसा लावली. मात्र त्या वादात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उडी घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट केले. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी येऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आव्हान दिलं. त्यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येनं मातोश्री बाहेर जमा झाले आहेत. राणा दाम्पत्यानं शिवसेनेला डिवचू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. मात्र आपण गनिमी काव्याने 'मातोश्री'वर येणारच असं रवी राणा यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शिवसैनिक पुन्हा 'मातोश्री'वर जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख बंटी-बबली असा केला. "बंटी आणि बबली जर मुंबईत पोहोचले असतील, तर आम्हाला काहीच हरकत नाही. ही स्टंटबाजी आहे, हे फिल्मी लोक आहेत. स्टंटबाजी किंवा मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आता भाजपला अशा लोकांची गरज भासते आपल्या मार्केटिंगसाठी. हिंदुत्वाची मार्केटिंग करण्याची गरज नाही. आम्हाला माहीत आहे हिंदुत्व काय आहे. रामजन्मोत्सव किंवा हनुमान चालिसा या स्टंट करण्याच्या गोष्टी नाहीत. या श्रद्धा, भावनेच्या गोष्टी आहेत. पण यांना स्टंटच करायचा असेल, तर करु देत. आता त्यांना कळेल मुंबई काय आहे", असं संजय राऊत म्हणाले.
"गुंगारे वैगरे काही नसतं. मुंबईचे पोलीस, शिवसैनिक हे फार सक्षम आहेत. स्टंट करायचं ज्यांनी ठरवलंय, त्याला काही कारण लागत नाही. भाजपला आता सध्या मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार्स, स्टंटबाज यांचा उपयोग करुन घेत आहेत. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही.", असं संजय राऊत म्हणाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, राणा दाम्पत्य शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास मुंबईत दाखल झाल्याची बातमी येताच शिवसैनिक 'मातोश्री' बाहेर जमा झालेत. खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारकडून असलेली वाय दर्जाची सुरक्षा न घेता राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याचं कळतंय. रवी राणा दाम्पत्य कार्यकर्त्यांसह मुंबईत येणार असल्याने रेल्वेची तिकीटं सुद्धा काढण्यात आली होती. तेव्हा शिवसैनिकांनी अमरावती स्टेशनला राणा दाम्पत्यांना रोखण्याची रणनीती आखली. परंतु राणा दाम्पत्य आता मुंबईत पोहचले आहेत. त्यामुळे मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी करत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.