मुंबई : भंगारातील कारमध्ये चोरीच्या कारमधील पार्ट टाकून, त्या स्वस्तात विक्री करणारी आंतराज्यीय टोळी मुंबईत सक्रिय झाली असल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाले. त्यामुळे सेकंड हँड कार घेताना सावध राहण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी केले आहे.निसार खान याच्यासह फैज अकबर शेख, अझिज शेख या सराईत आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. फैज आणि अझिज हे दोघे रस्त्याकडेला पार्क केलेल्या कार शिताफीने चोरत असत. त्यानंतर, भंगारमधून विकत घेतलेल्या कारमध्ये या कारचे पार्ट निसार पलटी करत असे. त्यानंतर, याच स्विफ्ट डिझायर बाजारात स्वस्तात विकण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. यातील निसार हा दिंडोशीतील म्हाडा कॉलनीजवळ येणार असल्याची माहिती, मोटार वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र जुवेकर यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी या ठिकाणी सापळा रचून निसारच्या मुसक्या आवळल्या, तर फैज आणि अकबरला पोलिसांनी आदल्या दिवशीच अटक केली.अपघात झालेल्या वाहनांची स्क्रॅपमध्ये विल्हेवाट लावून, त्या वाहनांची कागदपत्रे चोरीच्या वाहनांवर चढवित होते, तसेच त्यातील इंजिन, चेसीस बदलून ही मंडळी कारची विक्री करत. त्यांनी या कामासाठी पुण्यात गोडाउन घेतले होते. तेथूनच गाड्यांमध्ये पलटी मारण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी या गोडाउनवरही छापा टाकला आहे. या टोळीकडून तब्बल ७ स्विफ्ट डिझायर जप्त करण्यात आल्या आहेत, तसेच ३४ गाड्यांचे स्वीच, गाड्याच्या चाव्या, ३८ बीसीएम मशिन, २६ एसिएम मशिन, ७ ग्राइंडर मशिन, ८ पंच बॉक्स, ६ मूळ चेसिस क्रमांक कापलेले पत्रे, ९ इंजिन, चेसिस, एक कॉम्प्रेसर, २४ वेगवेगळ्या गाड्यांचे मिटर्स आणि २ गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. सध्या बाजारात स्विफ्ट डिझायरचा चाहता वर्ग लक्षात घेता, त्यांनी स्विफ्ट डिझायर कारला टार्गेट केले. स्वस्तात आवडीची कार मिळत असल्याने, अनेक नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकत गेले. मात्र, आपण घेत असलेली कार योग्य आहे का? याची माहिती ते घेत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे सेकंड हँड, तसेच नवीन कार घेतेवेळी कारच्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे, तसेच त्याच्या मालकाचीही खात्री करून घेणे गरजेचे असल्याचे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले. त्यामुळे अशी वाहने खरेदी करताना सावध राहाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)तपास पथकपोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र जुवेकर, सहायक पोलीस निरीक्षक जयंद्रथ तांबे, पोलीस उपनिरीक्षक विजय कदम, सहायक पोलीस उपनिरीक्षक बामणे, पोलीस अंमलदार विठ्ठल गायकवाड, मनोहर साळुंखे, संजय सोनकांबळे, राम बागम, बाळा गणगे, शैलेंद्र धनावडे, श्रीनिवास चौगुले, बाबू राऊत, प्रशांत भुमकर, चालक रमेश पासी यांनी आरोपींना अटक केली.
तुम्ही घेतलेली कार भंगारातील तर नाही ना?
By admin | Published: March 16, 2017 3:31 AM