हेमंत महाजन
यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चीनबरोबर भारताचे युद्ध झाल्यास तितक्याच ताकदीने त्यांना उत्तर देऊ. शिवाय अनेक राष्ट्रांशी विशेषतः अमेरिकेशी असलेल्या करारामुळे त्यांचेदेखील सैनिकी सहकार्य आपल्याला मिळणार आहे. म्हणूनच चीनने भारताबरोबर युद्धाचा प्रयत्न केल्यास त्यांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे विचार निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.
२०२१ मध्ये चीन भारताबरोबर युद्ध करील का, या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन व्याख्यानात महाजन यांची विचार मांडले.
आंतरराष्ट्रीय समुदायातदेखील भारताने केलेल्या सैनिकी कारवाईमुळे आपण प्रबळ आहोत, हे सिद्ध झाले आहे. एप्रिल २०२१ मध्ये बर्फ वितळण्यास सुरुवात होईल, त्या वेळी चीन लष्करी कारवाई सुरू करील का, असा मुद्दा चर्चेला आला तरी आपण तशी परिस्थिती हाताळण्यास आता अधिक सक्षम झालो आहोत. पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. सीमेलगत रस्ते तयार केले आहेत. अनेक प्रकारची युद्धसामग्री आपल्याकडे आहे. भारतीय ड्रोन तसेच राफेलसारखी विमाने आदींनी आपण पुरेपूर सज्ज आहोत. आपण त्यांचा मुकाबला तितक्याच ताकदीने करू शकू. त्याशिवाय इतर देशांशीदेखील आपण करार केले आहेत. त्यामुळे सागरी ताकद आपली अधिक आहे. अमेरिकेशी विविध करार आहेत. त्यामुळे अमेरिकेची सैनिकी ताकददेखील आपल्याला मिळू शकते, असेही हेमंत महाजन यांनी सांगितले.