नगरसेवकांनी प्रभाग सभा घेतल्या तर लोकांचे मूलभूत प्रश्न सुटतील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:54 AM2020-01-22T03:54:25+5:302020-01-22T03:55:41+5:30
नगरसेवकांनी पुढाकार घेत प्रभाग सभा घेतल्या, तर लोकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास गती मिळेल.
मुंबई : वॉर्डमध्ये गल्ली सभांच्या माध्यमातून प्रभाग सभांचा प्रचार आणि प्रसार, प्रभागातील मूलभूत प्रश्नांची सूची, आतापर्यंत झालेल्या कामांची मांडणी, राहिलेल्या कामांची मांडणी आणि त्यानंतर कार्यवृत्तांची मतदारांकडून मंजुरी, या वेगवेगळ्या माध्यमांतून नगरसेवकांच्या वॉर्डमधील मूलभूत प्रश्न लोकसहभागातून सोडविण्यावर प्रभाग सभा जोर देत आहे. अशा पद्धतीने नगरसेवकांनी पुढाकार घेत प्रभाग सभा घेतल्या, तर लोकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास गती मिळेल. विकेंद्रित व्यवस्था उभी राहण्यास मदत होईल, असा विश्वास प्रभाग सभांद्वारे मतदारांकडूनव्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या एफ नॉर्थमधील सायन कोळीवाडा वॉर्ड क्रमांक १७९ मध्ये १९ जानेवारी रोजी स्थानिक नगरसेवक सुफियान वणू यांच्या अध्यक्षतेखाली वॉर्डचे दोन यादी भाग (१२८, २२२) प्रभाग सभांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग सभा समर्थन मंच आणि सद्भावना संघ यांच्या सहयोगाने करण्यात आलेल्या प्रभाग सभेत वॉर्डमधील एकूण मतदार यादीतील २५० मतदार उपस्थित होते.
प्रभाग सभा आयोजित करण्यापूर्वी वॉर्डमध्ये गल्ली सभांच्या माध्यमातून प्रभाग सभांचा प्रचार आणि प्रसार समितीतर्फे करण्यात आला. यामध्ये गल्ली प्रतिनिधीने महत्त्वाची भूमिका बजावली. या सभांद्वारे प्रभागमधील मूलभूत प्रश्नांची सूची बनविण्यात आली. प्रभाग सभेचे कामकाज चार वाजता सुरू करण्यात आले. सुरुवातीला गीताच्या माध्यमातून उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर, प्रभाग सभा समितीचे सदस्य यासिन खान यांनी यापूर्वी झालेल्या प्रभाग सभेतील इतिवृत्तांचे वाचन केले.
आतापर्यंत झालेल्या कामांची मांडणी, राहिलेल्या कामांची मांडणी करून, या कार्यवृत्तांची मतदारांकडून मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर, प्रभाग समितीच्या माध्यमातून नगरसेवक आणि प्रशासनासोबत केलेल्या कामाचा लेखाजोखा समिती सदस्यांनी मांडला. लेखाजोखा मांडणीनंतर गल्ली सभांच्या माध्यमातून आलेल्या महापालिका संदर्भातील प्रश्नांची मांडणी सद्भावनाच्या प्रकल्प समन्वय श्रुती क्षीरसागर यांनी केली. मागील तीन वर्षांचे समितीचे कामकाज, प्रश्नांच्या मांडणीनंतर नगरसेवकांनी केलेल्या कामाचा कार्य अहवाल मांडण्याची विनंती करण्यात आली.
प्रभाग सभेच्या माध्यमातून आलेल्या सूचना, सूची यांचे निवेदन प्रभाग सभा समिती सदस्यांनी दिले. या प्रश्नांवर लोकसहभागातून विकास काम करण्याचे आश्वासन नगरसेवक सुफियान वणू यांनी दिले. दरम्यान, यावेळी प्रभाग सभा समिती सदस्य यासीन खान, इलियास शेख, फिरोज खान, गुलाम शेख, शेख मुस्ताक, नूरा सय्यद, हसन शेख, सुगरा खान, सुल्लाना शेख, सितारा शेख, सलिम कुरेशी, शबाना चौगुले, नुरुद्दीन चुलबूल, अनवर घाची, शब्बीर कुरेशी, इरशाद अली खान यांचे सहकार्य या प्रभाग सभेस लाभले.
कामकाज लोकसहभाग कायद्यानुसार
प्रभाग सभेचे कामकाज ७४व्या घटना दुरुस्ती अंतर्गत ३ जुलै, २००९ रोजी महापालिकेतील लोकसहभाग कायद्यानुसार करण्यात आले आहे. गेल्या ३ वर्षांपासून प्रभाग सभा समिती वॉर्ड मतदार, स्थानिक नगरसेवक, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन यांच्यासोबत प्रभाग सभा प्रक्रियेवर कार्यरत आहे. या अंतर्गत ही वॉर्डतील तिसरी सभा होती, असे सद्भावना संघाच्या वर्षा विद्या विलास यांनी सांगितले.
समिती सदस्य काय म्हणाले?
हा एकमेव नगरसेवक आहे, जो लोकसहभागतेला मान्यता देतो. लोकसहभागातून विकास कामे करण्यासाठी प्रभाग सभा घेण्यास उत्सुकता दाखवितो. प्रभाग सभा समितीसोबत दर महिन्याला वस्ती प्रश्नांवर नियोजन करण्याचे आश्वासन देतो.
पारदर्शक पद्धतीने लोकनिर्णय
जाहीर प्रभाग सभेत आलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा हा प्रभाग सभा समिती आणि मतदारांच्या माध्यमातून होईल. पारदर्शक पद्धतीने लोकनिर्णय व लोकसहभागातून ही प्रभाग सभा घेण्यात आली.