दोन दिवसांत ४७२ गुन्हे नोंद, विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक
संचारबंदीचा नियम माेडाल तर कारवाई हाेणारच!
दोन दिवसांत ४७२ गुन्हे नोंद; विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत संचारबंदीचे आदेश लागू असतानाही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकड़ून कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत ४७२ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून त्यांच्याविरुद्ध १५४ गुन्हे नाेंदवण्यात आले.
‘ब्रेक द चेन’अंतर्गत जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन मुंबईकर करत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर निर्बंध लागू करण्याच्या सूचना पाेलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना दिल्या. त्यानुसार मुंबईत पाेलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. शुक्रवारी मुंबईत २५६ गुन्हे नोंद झाले. तर शनिवारी २१६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. शहराची प्रवेशद्वारे आणि महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करुन वाहने आणि संशयित नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच गस्तीवरही भर देण्यात आला आहे.
कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्यासंबंधी (७८), हॉटेल आस्थापना (१८), पान टपरी (२), इतर दुकाने (९५), सार्वजनिक गर्दी (११७), अवैध वाहतूक (२), विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध (१५४) यासह इतर ६ गुन्हे असे एकूण ४७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात विनामास्क आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे.
....................