Join us

ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठविले तर बिलाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 4:07 AM

महावितरण : कोरोनाच्या काळात ऑनलाईन वीज बिल भरणा प्रणालीचा लाभ घ्यावालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ग्राहकांनी मीटर रीडिंगकडे ...

महावितरण : कोरोनाच्या काळात ऑनलाईन वीज बिल भरणा प्रणालीचा लाभ घ्यावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ग्राहकांनी मीटर रीडिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे; कारण सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने राज्यात संचारबंदी आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास वीजग्राहकांनी महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा वेबसाईटद्वारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविले तर वीज बिलाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता कमी असेल; म्हणून अशा ठिकाणी असलेल्या ग्राहकांनी स्वतः रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरण भांडुप परिमंडळाकडून करण्यात आले आहे.

महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संकेतस्थळावर, ॲपद्वारे ते ऑनलाईन वीज देयकाचा भरणा करू शकतात. या प्रणालीची कार्यपद्धती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आरटीजीएस / एनईएफटीद्वारे देयक भरणा करण्यासाठी सुविधा, सर्व लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व १० हजारांपेक्षा जास्त बिल असणाऱ्या लघुदाब घरगुती ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशील वीज बिलावर छापण्यात आला आहे. ग्राहक वीज देयकाचा भरणा क्रेडिट / डेबिट कार्ड, नेट बँकिंग व यू.पी.आय., इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करू शकतात. तसेच भारत बिल पेमेंटवरही वीज बिल भरणा करता येऊ शकतो.

क्रेडिट कार्ड वगळता इतर पद्धतीने वीज बिल भरणा नि:शुल्क आहे. ऑनलाईन देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ (जास्तीत जास्त रु. ५०० ) सवलत देण्यात आली आहे (टॅक्सेस व ड्यूटी वगळून). ग्राहकाने धनादेशाद्वारे भरणा केल्यास, महावितरणच्या खात्यात रक्कम जमा होण्याचा दिनांक, भरणा दिनांक म्हणून गृहीत धरला जातो. जर बँकेकडून धनादेश वटण्यास उशीर झाल्यास विलंब भरणा शुल्क डीपीसीचा भुर्दंड ग्राहकास बसू शकतो. तसेच धनादेश न वटल्यास चेक बाऊन्स शुल्क ७५० रुपयेही ग्राहकांस वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे आकारण्यात येते.

-----------------------

- ऑनलाईन बिल भरल्यास ग्राहकास त्वरित त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे पोहोच मिळते.

- संकेतस्थळावर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास भरणा तपशील व पावती उपलब्ध होते.

- ऑनलाईन वीज बिल भरणा सुरक्षित असून या संदर्भात काही तक्रार किंवा शंका असल्यास ग्राहक महावितरणशी संपर्क साधू शकतात.

- ग्राहकांनी गो ग्रीन या सुविधेसाठी नोंदणी केली तर याअंतर्गत ग्राहकाला बिलाऐवजी त्यांच्या नोंदणीकृत ईमेल वर ई-बिल पाठविण्यात येईल.

- गो ग्रीनसाठी नोंदणी केलेल्या ग्राहकास प्रत्येक बिलामध्ये १० रुपयांची सूट मिळणार आहे.

* ऑनलाइन सेवेचा लाभ घ्या

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात, रांगेत उभे राहून इतर व्यक्तींच्या संपर्कात न येता व रांगेत वेळ वाया न घालवता महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन वीज बिल भरणा सेवांचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा. ग्राहक आणि महावितरणने एकत्र मिळून कारवाई केल्यास वीज बिलाबाबत तक्रार कमी करता येईल.

- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ, महावितरण

-----------------------