ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. २५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धावत्या पाकिस्तान दौ-यावर मित्रपक्ष शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे बोचरी टीका केली आहे. आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा वाढदिवस आहे. उद्या भारताचा मोस्ट वॉंटेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाला नवाझ शरीफ मंत्रिमंडळातील मंत्री, पाकिस्तानी खासदार, आयएसआयचे अधिकारी उपस्थित रहातील, आजच्या मोदी-शरीफ भेटीनंतर दाऊदला पाकिस्तान भारताच्या स्वाधीन करणार असेल तर, नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौ-याच स्वागतच करु असे टोले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावले.
पाकिस्तानबरोबर कुठलीही डिप्लोमसी फायद्याची ठरलेली नाही, पाकिस्तानबद्दलची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. जो पर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही, तो पर्यंत त्यांच्याशी कुठलीही चर्चा करु नये असे राऊत म्हणाले. कालच काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १३ नागरीक जखमी झाल्याची आठवण राऊत यांनी करुन दिली.
नरेंद्र मोदी यांनी अचानक जाहीर केलेल्या पाकिस्तान भेटीच्या कार्यक्रमावर काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेनेही टीका केली. विरोधीपक्षांना मोदींनी विश्वासात घेतलं नाही हा जो काँग्रेसचा आक्षेप होता तसाच मित्रपक्षांना विश्वासात घेत नसल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतला.