'लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना हटवावे लागेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 06:00 PM2018-03-26T18:00:54+5:302018-03-26T18:05:54+5:30

संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर कोणाच्या कुठल्या शेपटावर पाय ठेवायचा, हे आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे.

If democracy wants to survive we have to remove Narendra Modi from power | 'लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना हटवावे लागेल'

'लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना हटवावे लागेल'

googlenewsNext

मुंबई: संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीवरून आक्रमक झालेले भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत शब्दांमध्ये टीका केली. या देशात लोकशाही टिकवायची असेल तर मोदींना सत्तेवरून हटवावे लागेल. मोदींनी देशात हिटलरशाही आणायचा प्रयत्न करू नये. सत्ता गेल्यानंतर हिटलरच्या साथीला त्याची मैत्रीण होती. मात्र, तुमच्यासोबत बायकोही नाही, अशी वैयक्तिक टीकाही आंबेडकर यांनी केली. 

संभाजी भिडे यांना अटक झाली नाही तर कोणाच्या कुठल्या शेपटावर पाय ठेवायचा, हे आम्हाला चांगल्याप्रकारे माहिती आहे. त्यामुळे तुमची जुनी प्रकरणं बाहेर काढायला आम्हाला भाग पाडू नका. लोकांमधील चीड, राग आणि उद्रेक लक्षात घ्या, असे आंबेडकर यांनी म्हटले. 

तसेच आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच्या एका प्रकरणाचा उल्लेख यावेळी केला. मोदी सरकारमध्ये गृहमंत्री असलेल्या हरेन पांड्या यांचा हल्लेखोरांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यावेळी हरेन पांड्या यांच्या पार्श्वभागावर गोळ्या लागल्या होत्या. मात्र, त्यांच्या गाडीच्या टपावर किंवा खाली गोळ्या लागल्याची कोणतीही खूण नव्हती. आम्ही हे मेलेले मुडदे मसणातून बाहेर काढू शकतो. ही भूते शांत राहावीत असे वाटत असेल तर भिडेंना मुकाट्याने अटक करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यांनी हे आश्वासन पाळले नाही, तर आम्ही विधानसभेला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. पुढच्यावेळी येताना सोबत 10 दिवसांची भाकरी घेऊन या, असे आवाहन आंबेडकर यांनी आंदोलकांना केले. मला माझे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे आहे. तुम्हाला पण तुमचे स्वातंत्र्य प्रिय असेल तर हा लढा सुरूच ठेवावा लागेल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.  

Web Title: If democracy wants to survive we have to remove Narendra Modi from power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.